30 C
Mumbai
Thursday, September 10, 2026
घरसंपादकीयहे मौन बोलकं आहे...

हे मौन बोलकं आहे…

Google News Follow

Related

उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी पुन्हा एकदा ड्रग्जचे सेवन करण्याचा आणि ड्रग्जच्या धंद्यात सक्रीय असल्याचा आरोप केला आहे. नार्कोटीक्स ब्युरोकडे आदित्य आणि दिनो मोरिया यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्यानंतर ऍड. ओझा यांनी मीडियासमोर अशाप्रकारचे अनेक गंभीर वारंवार केले आहेत. परंतु आदित्य ठाकरे मात्र भाजपाच्या नावाने ठणाणा करतायत. आपली प्रतिमा मलिन करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा वारंवार दावा करयात. या उठाठेवी करण्यापेक्षा ते ऍड.ओझा यांच्याविरोधात बदनामीचा दावा का ठोकत नाहीत?

ऍड. ओझा यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. आदित्य त्यापैकी एकाही आरोपाचे उत्तर देत नाहीत. ऍड. ओझा यांच्याबद्दल एक शब्द बोलत नाहीत. भाजपाच्या विरोधात मात्र त्यांची जोरदार बॅटींग सुरू आहे. ‘जो भाजपाच्या विरोधात टीका करेल त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न भाजपाच्या नेत्यांकडून केला जातो’, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. त्यांनी राहुल गांधी यांचे उदाहरण दिले. राहुलना पप्पू ठरवले, कारण ते भाजपावर टीका करतात, तसाच प्रयत्न माझ्याबाबत होतो आहे, गेली सहा वर्षे मला बदनाम केले जात आहे, असे ते म्हणाले.

मुळात सीबीआय चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले नाहीत. ते दिले आहेत, मुंबई उच्च न्यायालयाने. २०२२ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार विसर्जित झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद असो वा नसो ते सतत राज्याच्या गृहमंत्री पदावर आहेत. महाविकास आघाडी सरकारची अडीच वर्षे वगळली तर गृहमंत्री पदावर तेच आहेत. फडणवीसांना दिशा सिलियानचे प्रकरण सीबीआयकडे सोपवता आले असते. तसे काही घडले नाही. गेली चार वर्षे हे प्रकरण अगदीच थंड पडलेले होते. पोलिसांचा तपास एक इंचही पुढे सरकला नाही. सरकारला याप्रकरणात काही रस आहे, असे दिसले नाही. भाजपा सरकारमुळे आदित्य ठाकरे अडचणीत आले असेही कधी दिसले नाही. तरीही आदित्य ठाकरे भाजपाच्या विरोधात लुटुपुटुचे आरोप करतायत.

सीबीआयकडे हे प्रकरण तपासासाठी गेल्याचे श्रेय जर कोणाचे असेल तर ते एड.ओझा यांचेच आहे. त्यांनीच न्यायालयात हा लढा लावून धरला. उच्च न्यायालयाला त्यांच्या युक्तिवादात तथ्य जाणवले म्हणून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले.

हे ही वाचा:

नेपाळमध्ये पुन्हा चमत्कार! १० दिवसांनी बोगद्यातून चिनी कामगार जिवंत बाहेर

दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना कंगना रणौतने झापले!

तब्बल १३ वर्षांनंतर नक्षलवादी हल्ल्यातील आरोपी दोषी

२७ नोव्हेंबर ‘बालविवाह विरोधी दिवस’ म्हणून घोषित!

आदित्य ठाकरे यांचे या प्रकरणातील मौन संशयास्पद आहे. ‘दिशा प्रकरणाशी माझा संबंध नाही, म्हणून मला काहीही बोलायचे नाही’, असे ते म्हणतायत. परंतु या संबंधांवर त्यांनीच शिक्कामोर्तब केले आहे. दिशा प्रकरणाशी संबंध नसता तर तुम्ही सतीश सालियन प्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत कॅव्हीएट दाखल केले नसते. सुशांत प्रकरणी सीबीआयकडून क्लिनचिट मिळाल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले नसते.

दिशा सालियन प्रकरणात ऍड.ओझा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत मात्र आदित्य मौन बाळगून आहेत. या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बरेच काही म्हटले आहे. आदित्य ड्रग्जचे सेवन करतात, दिनो मोरियासोबत ड्रग्जचा व्यवसाय करतात. दिशा सालियनकडे ड्रग्जच्या धंद्याचे, कर्जत फार्म हाऊसमध्ये लहान मुलांशी संबंधित संशयास्पद प्रकार चालतात त्याचे पुरावे होते, म्हणून तिची हत्या करण्यात आली, अशा बऱ्याच बाबींचा उल्लेख आहे. ऍड. ओझा यांनी मीडियाच्या समोर याचा कैक वेळा उल्लेख केला आहे. सार्वजनिक जीवनात असलेले लोक स्वत:च्या प्रतिमेबाबत प्रचंड जागरुक असतात. आदित्य यांच्याबाबत वेगळेच चित्र दिसते. इतके अनर्गल आरोप झाल्यानंतर ते म्हणतात, ‘मला याबाबत बोलायचे नाही’. खरेतर आदित्य ठाकरे यांनी ऍड.ओझा यांच्या विरोधात बदनामीचा खटला ठोकला पाहिजे होता. परंतु याबाबत एकही शब्द न बोलता, ते भाजपावर शरसंधान करतायत.

नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने दिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांच्यात मोबाईलवर होणारा संवाद रेकॉर्ड केला असून त्यात ड्रग्जच्या धंद्याबाबत अनेक वेळा चर्चा झाली आहे. हा दावाही ऍड. ओझा यांचा. जर नार्कोटिक्स ब्युरोकडे हे पुरावे असतील तर सरकारला त्याची माहिती असणे अपेक्षित आहे. हे आरोप खोटे ठरवण्याची संधी आदित्य ठाकरे यांच्याकडे आजही आहे. एक रक्तचाचणी स्पष्ट करू शकते की, एखादी व्यक्ति ड्रग्ज घेते की नाही. ८ जूनच्या पहाटे आपण कुठे होतो हे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले. आजोबांचा मृत्यू झाल्यामुळे आपण तिथे होतो असे सांगितले. परंतु तीही थाप निघाली.

दिशा प्रकरणात आम्ही सादर केलेली माहिती चुकीची निघाली तर आमच्यावर कारवाई करा, असे ऍड. ओझा ठणकावून सांगतायत. परंतु ऍड.ओझा खोटे बोलतायत असे आदित्य ठाकरे एकदाही म्हणत नाहीत. दिशा सालियनचे वडील खोटे बोलतायत, असे आदित्य ठाकरे एकदाही म्हणत नाही.

एड. ओझा म्हणतायत की, आमच्याकडे पूर्वीपेक्षा मजबूत पुरावे आहेत. आमच्याकडे प्रत्यक्षदर्शी आहेत. ८ जूनच्या दिवशी गॅलेक्सी एपेक्समध्ये काही तरी आक्रित घडले होते. काही जणांच्या डोळ्यासमोर असे काही घडले जे पाहणे त्यांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकेल. असे काही प्रत्यक्षदर्शी दिशाच्या संशयास्पद मृत्यूनंतर गॅलेक्सी एपेक्स ही इमारत सोडून गेले. तिथे जे काही घडले होते, ते त्यांना ठाऊक होते काय? प्रत्यक्षदर्शींना दोष कसा देणार.

ज्या प्रकरणात बड्यांचा समावेश असतो तिथे प्रत्यक्षदर्शी असणे जीवावर बेतू शकते. दिव्या भारतीचा मृत्यू आठवतोयत का? बॉलिवूडमधला गोड गोंडस चेहरा. ५ एप्रिल १९९३ रोजी अवघ्या १९व्या वर्षी तिचा अपघाती मृत्यू झाला. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून ती पडली. मृत्यू संशयास्पद होता. या प्रकरणाबाबत प्रचंड गदारोळ उठला. बरीच उलट सुलट चर्चा झाली. तिचा मृत्यू झाला तेव्हा तिची केअर टेकर अमृता त्याच फ्लॅटमध्ये होती. या घटनेनंतर अमृता महिनाभर गायब झाली. ती अनेक वर्षे दिव्यासोबत होती. अनेक वर्षे तिचा काळजी घेत होती. दिव्याच्या मृत्यूनंतर ३० दिवसांनी बातमी आली की, अमृताचा हृदयविकाराने मृत्यू झाला. बड्यांच्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी असणाऱ्यांना असा अनपेक्षित मृत्यू येण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींबाबत काळजी घेतली पाहिजे. ऍड. ओझा यांनी त्यांच्याबाबत बोलणे टाळले पाहीजे.

ऍड.ओझा वारंवार सांगतायत की याप्रकरणात त्यांच्याकडे भरपूर पुरावे आहेत. त्यांचा विश्वास सार्थ ठरो, या प्रकरणातील खऱ्या दोषींवर कारवाई होवो, असे या देशातील लाखो करोडो लोकांप्रमाणे आम्हालाही वाटते. परंतु या देशाचा न्यायालयीन इतिहास या भावनेला टेकू देताना दिसत नाही. काही वर्षांपूर्वी एका मराठी माणसाच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण असेच गाजले होते. पुराव्यांबाबत चर्चा झाली होती. एका तरुण राजकीय नेत्याचे नाव यात घेतले जात होते. तिथेही सीबीआय चौकशी झाली. त्याची अखेरही क्लिनचिट आणि क्लोजर रिपोर्टनेच झाली होती. दिशाचे प्रकरण त्या दिशेने जाऊ नये ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची अपेक्षा आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
332,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा