भारताचे आजचे परराष्ट्र धोरण आता अधिक डोळस आणि वास्तववादी आहे. जेव्हा प्रश्न राष्ट्रहिताचा असतो तेव्हा बऱ्या वाईटाचा विचार आपण करत नाही. चांगुलपणाच्या भोंगळ कल्पना बाजूला पडलेल्या आहेत, जशास तसे ही आपली नीती बनलेली आहे. तालिबान सरकारच्या मंत्र्यांच्या भारतभेटी दरम्यान ही बाब बऱ्यापैकी स्पष्ट झालेली आहे. भविष्यात आपला शेजार बदलण्याची आपण तयारी करीत आहोत. भारताची वखान कॉरीडोअरवर नजर आहे. कारण अफगाणिस्तानचा शेजार भारताची श्रीमंती वाढवणारा आहे.
तालिबानचे परराष्ट्र मंत्री आमीर खान मुत्तकी सध्या भारताच्या भेटीवर आहेत. त्या आधी घडलेल्या काही घटना लक्षात घ्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकव्याप्त काश्मीरवर आम्हाला आक्रमण करण्याची गरज नाही, कारण हा भारताचा भूभाग आहे, तिथली जनताच आता म्हणेल की आम्ही भारतीय आहोत. आपल्या लष्कर प्रमुखांनी पाकिस्तानचा नकाशा बदलण्याचा इशारा दिला. त्यानंतर काही काळात मुत्तकी भारतात दाखल झाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात युद्ध पेटले.
तालिबान म्हटले की, आपल्याला बामियानमध्ये झालेला बुद्ध मूर्तिंचा विध्वंस आठवतो. महिलांवर अत्याचार आठवतात. बालकांचे लैंगिक शोषण आठवते. इस्लामी कट्टरता आठवते. तरीही अफगाणिस्तानमध्ये जे काही घडले आहे ते याक्षणी आपण नजरेआड करतोय, कारण काट्याने काटा काढता येतो, लोहा लोहे को काटता है, याची जाणीव सध्याच्या राज्यकर्त्यांना आहे.
पाकिस्तानला चेपण्यासाठी आपल्याला अफगाणिस्तानची गरज आहे. शत्रूचा शत्रू हा मित्र एवढे साधे सोपे गणित आपण लक्षात ठेवले आहे. मुत्तकी यांच्या पहिल्या पत्रकार परीषदेत महिला पत्रकार उपस्थित नव्हत्या. त्यामुळे त्यांना पत्रकार परिषदेत येण्यास बंदी असल्याचा अर्थ काढून पुरोगाम्यांनी काहूर माजवले. हे तेच पुरोगामी आहेत, ज्यांची प.बंगालमध्ये होणाऱ्या बलात्कारांबाबत दातखीळ बसलेली असते. मुलींनी रात्री बाहेर पडायचं कशाला? असे सवाल विचारणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्याबाबत जे मौन बाळगतात. अशा बिनबुडाच्या या कथित विचारवंतांकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.
मुत्तकी भारतात आल्यानंतर पाकिस्तानने काबूलवर हल्ला केला. त्याचे उत्तर देण्यासाठी तालिबानांनी पाकिस्तानच्या चौक्यांवर हल्ले केले. या धुमश्चक्रीत किमान २०० पाक सैनिकांचा बळी गेला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानी सैनिक चौक्या सोडून पळून गेले. ज्या सौदी अरेबियासोबत पाकिस्तानने अलिकडेच संरक्षण करार केला. तो सौदी काही पाकिस्तानच्या मदतीला आला नाही. पाकिस्तान किंवा सौदी यापैकी कोणत्याही देशावर हल्ला झाल्यास हा दोन्ही देशांवर हल्ला मानला जाईल. हे संरक्षण करारातील महत्वाचे कलम या निमित्ताने कलम झाले. कारण पाकिस्तान मार खात असताना सौदी शांतपणे मजा पाहात होता.
ही अफगाणिस्ताने भारताच्या दृष्टीने उपयुक्तता सिद्ध केली आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असे मुत्तकी यांनी जाहीरपणे सांगितले. पाकिस्तानी लष्करशहा यांचा कोळसा करणारे हे विधान होते. ही त्यांची उपयुक्तता आहे. पाकव्याप्त काश्मीर भारतात सामील करून घेणे हा विषय केवळ एक जमिनीचा तुकडा जोडण्यापुरता मर्यादित नाही. एकदा का पीओके भारतात आला की आपले अर्थकारण बदलणार आहे. व्यापाराचे गणित बदलणार आहे. गमावलेला सिल्क रुट पुनरुज्जिवीत होणार आहे.
हे ही वाचा:
२०२७ चा क्रिकेट वर्ल्डकप विराट, रोहित खेळणार?
एआय हब स्थापनेसाठी गुगलकडून अमेरिकेबाहेरची सर्वात मोठी गुंतवणूक भारतात!
कोविडने बाधित वडिलांच्या मुलांच्या मेंदूवर होऊ शकतो परिणाम
शुभमन गिलने जिंकली कारकीर्दीतील पहिली कसोटी मालिका
पाकव्याप्त काश्मीरचा भारताने पुन्हा ताबा मिळवल्यास भारत आणि अफगाणिस्तान या दोन देशांच्या दरम्यान १०६ किमीची सीमा निर्माण होईल. ही सीमारेषा लडाखच्या लेह परिसरातून अफगाणिस्तानातील बदख्शान प्रांतातील वाखान कॉरीडोअरला भिडेल. हा अत्यंत डोंगराळ आणि दुर्गम भूभाग असला तरी वाखान कॉरीडोअरच्या माध्यमातून भारत थेट मध्य आशियाशी जोडला जाईल. तिथून युरोप आणि रशियापर्यंत भारत भूमार्गाने जोडला जाऊ शकतो.
हा एकेकाळी भारताच्या सिल्क रूटचा एक भाग होता. याच मार्गाने मध्य आशिया व युरोपशी आपला थेट व्यापार सुरू होता. आपले कापडचोपड, मसाल्याचे पदार्थ इथूनच मध्य आशिया आणि युरोपात जात असत. पुन्हा हा मार्ग अस्तित्वात येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मध्य आशियातील कझाकिस्तान, तुर्कमिस्तान, उझबेकिस्तान, ताजिकीस्तान, किरीगिझस्तान हे देश नैसर्गिक साधनसंपन्न आहेत. विशेष करून खनिजे, तेल, युरेनियम इथे मुबलक प्रमाणात आढळते. रशियाची शकले झाल्यानंतर इथे चीनने आपला प्रभाव निर्माण केला. पीओके ताब्यात आल्यास हे देश भारताशी थेट जोडले जाणार आहेत.
२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडला आहे. तो पूर्ण करण्यासाठी अर्थकारणाला मजबुती देणे गरजेचे आहे. पीओके भारतात सामील करून घेणे या आर्थिक मजबुतीसाठी आवश्यक आहे. भारताच्या व्यापारासाठी लागणाऱ्या प्रवास खर्चात यामुळे मोठी कपात होईल. दिल्ली-लेह-काराकोरम ते मध्य आशिया असा रेलमार्ग किंवा महामार्ग निर्माण करणे शक्य होईल. भारत मध्य आशिया, युरोप आणि रशियाच्या अधिक जवळ येईल.
समुद्र मार्गे सध्या आपला व्यापार सुरू आहे. हा मार्ग अधिक लांब, वेळखाऊ आणि खर्चिक आहे. मुंबई किंवा गुजरातमधून अरबी समुद्रातून आधी सुवेझ कालवा, तिथून पुढे भूमध्य समुद्र आणि त्यानंतर युरोपात माल पाठवतो. इतका मोठा वळसा घातल्यामुळे होणारा वाहतूक खर्च आणि वेळ वखान कॉरीडोअरमुळे ३०-४०% पर्यंत कमी होईल. इंधन, टोल, भांडवली खर्चात मोठी बचत होईल. चीनने चायना पाकिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरची निर्मिती याच कारणासाठी केली होती. पीओके भारताला जोडून आपण भारत अफगाणिस्तान इकोनॉमिक कोरीडोअरची (BAEC)निर्मिती करू शकतो. हा मार्ग भारताच्या अर्थकारणाला अधिक मजबुती देऊ शकेल. आज तरी हा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यात असल्यामुळे गेली सात दशके भारत आपल्या पारंपरीक सिल्क रुटपासून वंचित आहे. जो लाभ भारताला मिळायला हवा तो चीनला मिळतोय.
म्हणून अफगाणिस्तानचा शेजार भारतासाठी महत्वाचा आहे. भारतीय कृषी, वस्त्रोद्योग, फार्मा, ऑटोमोबाईल, आयटी क्षेत्रातील निर्यात या मार्गामुळे वाढू शकेल. वाहतूक खर्च आणि वेळ वाचल्यामुळे भारतीय माल जागतिक बाजारात स्वस्तात उपलब्ध होऊ शकेल. भारताची चीन आणि पाकिस्तानवर रणनीतिक पकड मिळेल, CPEC आणि इतर प्रकल्पांवर नियंत्रण मिळेल, भारती सुरक्षा आणि सामरिक स्वायत्तता वाढेल. नवीन लॉजिस्टिक्स हब, रस्ते, रेल्वे प्रकल्प यामुळे स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर मोठा वेग आर्थिक वृद्धीला येईल.
भारताला थेट आशिया-युरोप सुमारे १० लाख कोटी रुपयांच्या व्यापाराचा रस्ता खुला होईल. भारताचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे ताजे विधान पाहिले तर भारताची तयारी कोणत्या दिशेने सुरू आहे हे लक्षात येऊ शकते. जगाच्या नकाशावर अस्तित्व टिकवण्याची इच्छा असेल तर पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग सोडला पाहिजे. भविष्यात पुन्हा संघर्ष उद्भवला तर ऑपरेशन सिंदूरच्या काळात भारताने दाखवलेला संयम आम्ही पुन्हा दाखवणार नाही.
अर्थ स्पष्ट आहे, पाकिस्तानने पुन्हा आगळीक केली तर पाकिस्तानचा नकाशा मिटवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी भारत सज्ज झाला आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







