भारतीय क्रिकेट संघ लवकरच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. तर, भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली हे आठ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतील आणि एकदिवसीय सामने खेळातील. देशभरातील चाहत्यांचे त्यांच्या पुनरागमनाकाडे लक्ष लागलेले असून २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठीही त्यांनी खेळावे अशी इच्छा चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावर भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भाष्य केले आहे.
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठीच्या भारताच्या योजनांमध्ये भारताचे फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना आतापासून स्थान देण्याची हमी देण्यास गौतम गंभीर यांनी नकार दिला आहे. कोहली आणि रोहित यांनी या वर्षाच्या सुरुवातीला यूएईमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहभाग घेतला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने ही स्पर्धा जिंकली. तर त्यांनी कसोटी क्रिकेट आणि टी- २० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने आता ते दोघेही ऑस्ट्रेलियाच्या व्हाईट-बॉल दौऱ्यातील एकदिवसीय टप्प्यात पुन्हा मैदानात उतरतील.
नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये माध्यमांशी बोलताना गौतम गंभीर यांनी ही टिप्पणी केली. गौतम गंभीर यांनी कोहली आणि रोहितच्या भविष्याबद्दल मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या भूमिकेचे समर्थन केले. भारताच्या मुख्य प्रशिक्षकांनी संकेत दिला की, ते कोहली आणि रोहितबद्दल दीर्घकालीन निर्णय घेण्याऐवजी परिस्थितीनुसार खेळाकडे पाहण्यास प्राधान्य देतील, २०२७ च्या विश्वचषकापूर्वी केवळ सातत्यपूर्ण कामगिरी आणि तंदुरुस्तीच त्यांची भूमिका निश्चित करेल यावर भर दिला.
हे ही वाचा :
एआय हब स्थापनेसाठी गुगलकडून अमेरिकेबाहेरची सर्वात मोठी गुंतवणूक भारतात!
बालकांच्या मृत्यूनंतर भारतात ‘या’ तीन खोकल्याच्या सिरपविरुद्ध WHO चा इशारा
ग्वाल्हेरमध्ये एअरबेसजवळ १२ वर्षांपासून राहत होते बांग्लादेशी घुसखोर; ८ जणांना अटक!
आयपीएस अधिकारी आत्महत्या प्रकरणी हरियाणाचे पोलीस महासंचालक सक्तीच्या रजेवर
गौतम गंभीर म्हणाले की, “२०२७ चा विश्वचषक अजून अडीच वर्षे दूर आहे. वर्तमानात टिकून राहणे महत्त्वाचे आहे. कोहली आणि रोहित दोघेही दर्जेदार खेळाडू आहेत. आशा आहे की त्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा यशस्वी होईल,” असे गंभीर म्हणाले. यापूर्वी या महिन्याच्या सुरुवातीला, अजित आगरकर यांनी कोहली आणि रोहित हे भारताच्या दीर्घकालीन एकदिवसीय विश्वचषक योजनांचा भाग राहतील की नाही हे स्पष्ट करण्याचे टाळले. त्यामुळे असे बोलण्यात येत आहे की, ही मालिका दोघांसाठी खेळ दाखवा अन्यथा बाहेर व्हा अशा अर्थी महत्त्वाची असणार आहे. परंतु, एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाल्यानंतर शुभमन गिलने पत्रकार परिषदेत ही चर्चा थांबवली आणि म्हटले की संघाला आयसीसी स्पर्धेत त्यांचा अनुभव आणि सामना जिंकण्याची क्षमता आवश्यक आहे.







