आयपीएल २०२६ मधील ५८व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्सचा ६ विकेट्सनी पराभव करत शानदार विजय मिळवला. या विजयाचा खरा हिरो कोण? असा प्रश्न विचारला असता कर्णधार जसप्रीत बुमराहने कोणताही विचार न करता तिलक वर्मा आणि शार्दुल ठाकूर यांची नावं घेतली.
तिलक वर्माने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये ७५ धावांची तुफानी खेळी करत पंजाबच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला विकेट्स पडत असतानाही तिलकने शांतता, संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवत मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं.
तर शार्दुल ठाकूरने गोलंदाजीत कमाल करत ४ षटकांत ३९ धावा देत ४ महत्त्वाचे बळी घेत पंजाबच्या डावाला मोठा धक्का दिला. विशेषतः मधल्या षटकांत त्याने घेतलेल्या विकेट्समुळे सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने झुकला.
विजयानंतर बोलताना बुमराह म्हणाला,
“तिलकची खेळी आणि शार्दुलची गोलंदाजी… दोघांनाही समान श्रेय मिळायला हवं. दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत होत्या, काही फलंदाज अपयशी ठरत होते, पण तिलकने आपला आत्मविश्वास ढळू दिला नाही. त्याने शेवटपर्यंत सामना संपवला.”
बुमराहने विल जॅक्सचंही कौतुक करत सांगितलं की, छोटी खेळी असली तरी अशा धावा टी-२० क्रिकेटमध्ये खूप फरक घडवतात.
हेही वाचा :
याचबरोबर आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कर्णधारपद सांभाळताना मिळालेल्या अनुभवाबद्दल बोलताना बुमराह म्हणाला,
“टेस्ट आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद केलं आहे. आता फक्त वनडे बाकी आहे,” असं म्हणत त्याने हसत वातावरण हलकं केलं.
सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणं आता अधिक कठीण झाल्याचंही बुमराहने मान्य केलं. “चेंडू खूप उडत होता. त्यामुळे आम्ही स्लोअर बॉल आणि स्टंप लाईनवर लक्ष केंद्रित केलं. गोलंदाजांनी प्लॅन जबरदस्त रितीने अंमलात आणला,” असं तो म्हणाला.







