जागतिक राजकारण हा मेंदूला मुंग्या आणणारा विषय आहे. एका बाजूला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालतायत, पाकिस्तानचे नेते अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल मायकल कुरीला यांचा ‘निशाने इम्प्तियाज’ हा त्यांच्या देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरवतायत आणि अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’, भारताच्या ‘इस्त्रो’सोबत हातमिळवणी करते आहे. ३० जुलै रोजी नासा (NASA) आणि इस्त्रोचा (ISRO )संयुक्त उपक्रम असलेल्या ‘नासा इस्त्रो सिंथेटीक एपर्चर रडार’ अर्थात ‘निसार’ या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. अवघ्या पृथ्वीची १२ दिवसात फेरी मारण्याची क्षमता या उपग्रहात आहे. इस्त्रोला काही महिन्यापूर्वी आलेले एक मोठे अपय़श पुसण्याची ताकद या मोहिमेत आहे.
गेल्या काही वर्षात ‘इस्त्रो’चा लौकीक इतका वाढला आहे की, अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ला सुद्धा इस्त्रोसोबत काम करण्याचा वारंवार मोह होतोय. ३० जुलै रोजी दोन्ही अंतराळ संस्थांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या ‘निसार’चा मुहुर्त ठरला आहे. ही भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या अंतराळ संस्थांचा महत्त्वाकांक्षी संयुक्त उपग्रह प्रक्षेपण मोहीम आहे. पृथ्वीच्या पर्यावरणाचा आणि नैसर्गिक बदलांचा अभ्यास करण्यासाठी हा उपग्रह अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
निसार हा ‘सिंथेटिक अपर्चर रडार’ (SAR) तंत्रज्ञानाचा वापर करणारा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून पृथ्वीचा भूभाग आणि बर्फाच्छादित भागाचे उच्च रिझोल्यूशन क्षमतेने निरीक्षण करणे शक्य होणार आहे. यासाठी ‘नासा’ने विकसित केलेला एल-बँड आणि ‘इस्रो’ने विकसित केलेला एस-बँड. या दुहेरी फ्रिक्वेन्सींचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे, निसार कोणत्याही हवामानात, दिवसा किंवा रात्री, ढगांमधून किंवा जंगलातून आरपार पाहू शकतो आणि अत्यंत अचूक माहिती गोळा करू शकतो. तो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील १ सेंटीमीटर उंचीपर्यंतचे लहान बदल देखील पाहू शकतो. दर १२ दिवसांनी जगाची परीक्रमा पूर्ण करण्याची क्षमता या उपग्रहात आहे.
हे ही वाचा:
कारगिल युद्धातील वीरांच्या यशोगाथेने विद्यार्थी मंत्रमुग्ध
गुगलने ऑस्ट्रेलियन सरकारला का दिला कारवाईचा इशारा ?
“चला जिंकूया मित्रांनो, देशासाठी काहीतरी करूया!”
कर्नल सोफिया यांच्यावरील टीका प्रकरण : ‘त्या’ मंत्र्याला सुप्रीम कोर्टाने झाडले
एक गोष्ट लक्षात घ्या. अमेरिकेला घरघर लागली असली तरी ती आजही जागतिक महासत्ता आहे. ‘नासा’चे बजेटही ‘इस्त्रो’च्या तुलनेत अतिप्रचंड असते. तरीही ‘नासा’ला इस्त्रोसह काम कऱण्याची गरज का वाटते. याची कारणे पाहणे महत्वाचे ठरते. कारण गरज नसेल तर जगात कोणीही हात पुढे करत नाही. नासा आणि इस्रो यांच्यातील ‘निसार’ मोहीम हे आंतरराष्ट्रीय सहकार्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या सहकार्यामागे अनेक कारणे आहेत:
‘निसार’ उपग्रहामध्ये नासाचा L-बँड आणि इस्रोचा S-बँड असे दोन भिन्न रडार सिस्टम एकत्र आणण्यात आले आहेत. दोन्ही संस्थांकडे विशिष्ट क्षेत्रांमध्ये विशेष कौशल्ये आणि तंत्रज्ञान आहे. एकत्रितपणे ते एक अधिक शक्तिशाली आणि सक्षम उपग्रह तयार करू शकतात, जो तयार करणे एकट्याने कदाचित शक्य होणार नाही.
संपूर्ण पृथ्वीचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करण्यासाठी तुमच्याकडे उच्च-रिझोल्यूशनची क्षमता असलेले रडार असावे लागतात. अशा प्रकारे संपूर्ण पृथ्वीचे निरीक्षण करणे हे खूप मोठे आणि खर्चिक काम आहे. दोन्ही संस्थांच्या संसाधनांचा आणि कौशल्याचा उपयोग केला तर ते थोडे सोपे आणि सुलभ होण्याची शक्यता असते.
अंतराळ मोहिमा प्रचंड खर्चिक असतात. ‘निसार’ हा त्याला अपवाद नाही. ‘निसार’साठी ‘नासा’ सुमारे $१.५ अब्ज खर्च करत आहे, तर ‘इस्रो’ सुमारे ₹४६९.४ कोटी खर्च करत आहे. दोन्ही संस्थांमध्ये खर्च आणि जबाबदारी वाटून घेतल्याने प्रत्येकावरील आर्थिक भार कमी होतो. नासाच्या तुलनेत इस्त्रोकडे एक महत्वाची ताकद आहे. ती म्हणजे ‘इस्त्रो’चा कमी खर्चात भव्यदिव्य घडवण्याचा इतिहास आहे. ‘मिशन चांद्रयान-३’ हे त्याचे ताजे उदाहरण आहे. अवघ्या $७५ दशलक्षमध्ये भारताने ही मोहिम पूर्ण केली. जिथे हॉलिवूड सिनेमा ‘इंटरस्टेलर’चे बजेट $१७५ दशलक्ष डॉलर होते. म्हणजे ‘चांद्रयान-३’ मोहिमेच्या दुपटीपेक्षा जास्त. ‘इस्त्रो’चा हा जुगाड ‘नासा’ला मोहात पाडणारा आहे. ‘नासा’ ‘निसार’ प्रकल्पात जी रक्कम गुंतवते आहे, त्या तुलने भारताची गुंतवणूक कमी असली तरी या रकमेत भारत जे काही घडवेल ते खूप मोठे असेल याची जाणीव ‘नासा’ला आहे. या वैज्ञानिक सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध आणि जागतिक स्तरावर भारताची अंतराळ क्षेत्रातील भूमिका मजबूत होते.
‘नासा’ आणि ‘इस्रो’ने यापूर्वीही अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य केले आहे, परंतु ‘निसार’ ही सर्वात मोठी संयुक्त पृथ्वी विज्ञान मोहीम आहे. अलीकडच्या काळात, भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील यशस्वी मोहिमेनंतर नासा-इस्रोचे हे नवे सहकार्य आहे. या दोन्ही संस्थांनी एकमेकांशी डेटा आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केलेली आहे.
भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी, भूस्खलन आणि पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींच्या हालचाली आणि परिणामांचा अभ्यास करणे. यामुळे आपत्ती व्यवस्थापनात मदत होईल आणि पूर्वतयारी सुधारता येईल. ग्लेशियर (हिमनदी) वितळणे, समुद्रातील बर्फाचे बदल, समुद्राची पातळी वाढणे, किनारी भागातील धूप आणि वनस्पतींच्या आवरणातील बदल यांसारख्या हवामान बदलांशी संबंधित माहिती गोळा करणे. पिकांची वाढ, जमिनीतील ओलावा आणि वनस्पतींचे आरोग्य यावर लक्ष ठेवणे. यामुळे शेतीतील सुधारणा आणि पाण्याच्या व्यवस्थापनात मदत होईल.
इको सिस्टीममधील अडथळे आणि जंगलतोड यासारख्या मानवी आणि नैसर्गिक हस्तक्षेपांचे निरीक्षण करणे. निसार मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट वैज्ञानिक संशोधन आणि नागरी उपयोगिता हे आहे. यातून गोळा होणारा डेटा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन, शेती, हवामान बदल अभ्यास आणि पर्यावरणीय निरीक्षण यासाठी वापरला जाईल.
प्रत्यक्षपणे, ‘निसार’ हा ‘संरक्षण’ उपग्रह म्हणून तयार केलेला नाही. मात्र, अप्रत्यक्षपणे या मोहिमेतून मिळणारा डेटा भारताच्या संरक्षण दलासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो.
‘निसार’ची उच्च रिझोल्यूशन क्षमता सीमावर्ती भागातील भूभागाचे बदल आणि हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. म्हणजे तुमच्या सीमेवर होणारी हालचाल, कोण बंकर बनवतो आहे, कोण रस्ते, पुलांची निर्मिती करतो आहे. सीमेवर दहशतवादी किंवा लष्कराची काही मोठी हालचाल होते आहे, काय असा सगळा तपशील टीपण्याची क्षमता ‘निसार’मध्ये असेल. जेव्हा तुमच्या कडे जगातील सगळ्या हालचाली टीपणारा डोळा असतो तेव्हा तुमच्याकडे चांगली-वाईट अशी बरीच माहिती येते. आंतरराष्ट्रीय अंतराळ कायद्यानुसार आणि देशांच्या सार्वभौमत्वानुसार, एखाद्या देशावर किंवा संवेदनशील ठिकाणांवरून मिळवलेल्या उच्च-रिझोल्यूशन डेटावर काही प्रमाणात नियंत्रण असू शकते. परंतु तुमच्या कडे अशा प्रकारची माहिती असणे हे तुमची ताकद वाढवणारे असते.
नैसर्गिक आपत्तींच्या वेळी, जसे की पूर किंवा भूस्खलन, यातून मिळणारी माहिती संरक्षण दलांना मदत आणि बचाव कार्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हवामान आणि विशिष्ट भूभागाबद्दलची अद्ययावत माहिती सैन्याच्या कारवायांसाठी पूरक ठरू शकते, जरी ती थेट संरक्षण-विशिष्ट डेटा नसली तरी. थोडक्यात, ‘निसार’चा प्राथमिक उद्देश वैज्ञानिक आणि नागरी आहे, परंतु त्याचे काही अप्रत्यक्ष उपयोग संरक्षणाशी संबंधित असू शकतात, विशेषतः भू-निरीक्षण आणि आपत्कालीन परिस्थितीत.
सर्वात महत्वाचे म्हणजे या उपग्रहावर भारताचे थेट नियंत्रण असेल. ‘निसार’ची कक्षा भ्रमंती, म्हणजे भ्रमंतीचा मार्ग आणि एल बॅंड रडारवर नासाचे नियंत्रण असेल.
‘निसार’चा सगळा डेटा म्हणजे वातावरण, शेती, आपत्ती आणि पर्यावरण या संदर्भातील माहिती सगळ्यांसाठी उपलब्ध असेल असे म्हटले असले तरी त्याचे नियंत्रण आपल्याकडे कसे असेल हे लक्षात घ्या. उपग्रहाने टीपलेला हा डेटा एक ते दोन दिवसांत जगाला उपलब्ध होईल. आपत्तीशी संबंधित डेटा काही तासात उपलब्ध होईल. भारताच्या ‘नॅशनल रिमोट सेंसिंग सेंटर’च्या माध्यमातून तो वितरीत केला जाईल. हा डेटा जर वितरीत केला जाणार असेल तर काय वितरीत करायचे आणि काय नाही, हे ठरवण्याचा अधिकार आपल्यालाच असेल, असे मानायला वाव आहे.
‘इस्त्रो’च्या माध्यमातून आपण जगातील अनेक देशांशी संबंध जोडले, असलेले संबंध भक्कम केले. ‘निसार’ त्या संबंधाना आणखी वेगळ्या पातळीवर नेण्याची क्षमता ठेवणारा उपक्रम आहे. या मोहिमेमुळे जगातील देशांना पर्यावरणाशी संबंधित अशी माहिती पुरवू शकतो, ज्याचा थेट संबंध त्यांच्या विकासाशी किंबहुना अस्तित्वाशी आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







