अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, इराणविरोधातील संघर्षादरम्यान अनेक नाटो सहयोगी देशांनी अमेरिकेची निराशा केली. अमेरिकेला लष्करी मदतीची गरज नसली तरी मित्रदेशांकडून अधिक निष्ठा आणि पाठिंबा अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील महिन्यात तुर्कियेची राजधानी अंकारा येथे होणाऱ्या नाटो शिखर परिषदपूर्वी ट्रम्प यांनी बुधवारी (स्थानिक वेळेनुसार) व्हाईट हाऊसमध्ये नाटोचे महासचिव मार्क रुटे यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी इराणविरोधात अमेरिकेने ठोस भूमिका घेतली असली तरी काही युरोपीय सहयोगी देशांच्या प्रतिसादामुळे निराशा झाल्याचे सांगितले.
ट्रम्प म्हणाले, “आम्हाला या कारवाईत कोणत्याही मदतीची गरज नव्हती. आम्ही पहिल्याच आठवड्यात परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र, आमचे मित्रदेश किमान मदत करण्याची तयारी दाखवतील, अशी अपेक्षा होती.” त्यांनी काही देशांचा उल्लेख करत म्हटले, “मला इटलीकडून निराशा झाली. ब्रिटनकडून निराशा झाली. जर्मनी आणि फ्रान्सकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. एकूणच अनेक सहयोगी देशांनी निराश केले.”
मार्क रुटे यांनी काही बाबतीत नाराजीचे कारण असू शकते, असे मान्य केले. मात्र, युरोपीय देशांनी अमेरिकेला आवश्यक तांत्रिक आणि लॉजिस्टिक मदत पुरवल्याचे त्यांनी सांगितले. रुटे म्हणाले, “युरोपमधील हवाई तळांचा वापर न करता अमेरिकेला इराणवर कारवाई करणे अत्यंत कठीण ठरले असते. संघर्षादरम्यान युरोपीय हवाई तळांवरून ४,००० ते ५,००० अमेरिकन विमानांनी उड्डाण केले.”
ट्रम्प यांनी नाटो सदस्य देशांनी संरक्षण खर्च वाढवावा, यासाठी पुन्हा एकदा दबाव आणला. ते म्हणाले, “मुख्य प्रश्न हा आहे की सदस्य देश जीडीपीच्या ५ टक्के संरक्षण खर्चाचे लक्ष्य पूर्ण करत आहेत का? सहा महिन्यांपूर्वी त्यांनी यावर सहमती दर्शवली होती, पण बहुतांश देश अजूनही ते पूर्ण करत नाहीत.” रुटे यांनी मात्र जर्मनी, पोलंड, डेन्मार्क, बाल्टिक देश आणि इतर सहयोगी देश संरक्षण बजेटमध्ये मोठी वाढ करत असल्याचे सांगितले. तसेच युरोप आणि कॅनडामधील वाढलेल्या संरक्षण खर्चाचे श्रेयही त्यांनी ट्रम्प यांच्या नेतृत्वाला दिले.
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की अमेरिकेची सहयोगी देशांकडून पहिली अपेक्षा आर्थिक मदतीची नाही. ते म्हणाले, “मला फक्त त्यांची निष्ठा हवी आहे. आम्हाला त्यांच्या पैशांची गरज नाही. आमच्याकडे जगातील सर्वात शक्तिशाली लष्कर आहे. पण मित्रदेशांनी आमच्या पाठीशी उभे राहावे, हीच अपेक्षा आहे.”
हे ही वाचा:
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना समर्पित भारत घडवू
पीओकेमध्ये आंदोलन चिघळले; पाकिस्तानने अन्न, इंधन, औषधांचा पुरवठा रोखला?
व्हेनेझुएलाला शक्तिशाली भूकंपांचा दुहेरी तडाखा; अनेक इमारती कोसळल्या
वैभव सूर्यवंशीसाठी ICCचा खास नियम
रुटे यांनी इराणच्या अण्वस्त्र क्षमतेला जागतिक सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे सांगत ट्रम्प यांच्या भूमिकेचे कौतुक केले. ते म्हणाले, “इराणकडे अण्वस्त्र क्षमता असणे संपूर्ण जगासाठी धोकादायक ठरेल. त्यामुळे या विषयावर अमेरिका घेत असलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.” ट्रम्प यांनीही इराणसोबतची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे सांगितले. “इराणसोबतच्या आमच्या चर्चा चांगल्या सुरू आहेत. ते काही मोठ्या सवलती देण्यास तयार आहेत,” असे त्यांनी म्हटले.







