वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या ब्रिक्स गटाच्या वार्षिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, भारताने आयोजित केलेल्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची नवी दिल्लीत दाखल झाले. १४ आणि १५ मे रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय चर्चेचे अध्यक्षस्थान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर भूषवतील. भारताने अराघची यांचे आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर पोस्ट केले की, “ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत आगमन झालेल्या इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांचे हार्दिक स्वागत.”
अराघची हे ‘मिनाब १६८’ नावाच्या इराणी विमानातून उतरले. अमेरिका- इस्रायल युद्धादरम्यान, इराणच्या दक्षिणेकडील मिनाब शहरातील एका शाळेवर अमेरिकेने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ठार झालेल्या १६८ मुलींचा हा एक प्रतिकात्मक संदर्भ आहे. विमानाचे हे नाव इराणमध्ये एक शक्तिशाली प्रतीक बनले आहे, जिथे अधिकारी नागरिकांवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्याचा पुरावा म्हणून वारंवार मिनाब हल्ल्याचा उल्लेख करतात.
इराण संघर्ष आणि गटाच्या भविष्यातील दिशेवरून मतभेद वाढत असताना, ब्रिक्स गटासाठी अत्यंत अस्थिर काळात होणाऱ्या या बैठकीला सदस्य आणि भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी मंडळे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
इराण, ब्रिक्स सदस्य देशांवर, विशेषतः सध्याचे अध्यक्ष असलेल्या भारतावर, अमेरिका-इस्रायलच्या लष्करी मोहिमेविरोधात अधिक कणखर राजनैतिक भूमिका घेण्यासाठी दबाव टाकत आहे. तेहरानने यापूर्वी नवी दिल्लीला, शत्रुत्व थांबवण्यासाठी ब्रिक्समधील आपल्या स्वतंत्र भूमिकेचा वापर करण्याचे आवाहन केले होते. गेल्या महिन्यात, आखातातील ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांशी संबंधित आरोपांवरून इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात मतभेद निर्माण झाल्यानंतर, ब्रिक्स अधिकारी या संघर्षावर संयुक्त निवेदन जारी करण्यात अयशस्वी ठरले. या चर्चेची माहिती असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, या मतभेदांमुळे परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेपूर्वी एकमताची भूमिका तयार करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये गुंतागुंत निर्माण झाली. सध्याच्या बैठकीतून युद्धावर एकसंध निवेदन जारी होईल की नाही, हे अद्याप अस्पष्ट आहे.
हे ही वाचा:
पालघरमध्ये अनधिकृत बांधकाम दाखवणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या
चीन दौऱ्यावर डोनाल्ड ट्रम्प, पण स्वागताला शी जिनपिंग नाहीत
सलग पाचव्या विजयासह गुजरात टायटन्स अव्वल, हैदराबाद तिसऱ्या स्थानावर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बीजिंग दौऱ्यामुळे चीनचे सर्वोच्च राजनैतिक अधिकारी वांग यी ब्रिक्स बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. हा दौरा नवी दिल्लीतील बैठकीच्याच दिवशी येत आहे. त्याऐवजी बीजिंगने चीनच्या वतीने उपस्थित राहण्यासाठी भारतातील चीनचे राजदूत शू फेईहोंग यांची नियुक्ती केली आहे. सहभाग निश्चित केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांचा समावेश आहे. या दौऱ्यादरम्यान परराष्ट्र मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या बैठकीत परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. भू-राजकीय तणावामुळे सुरक्षा, ऊर्जा आणि राजनैतिक प्राधान्यक्रमांवर सदस्य राष्ट्रांमध्ये वाढत्या विभाजनाच्या पार्श्वभूमीवर, ब्रिक्स आपली अंतर्गत एकजूट कितपत टिकवून ठेवू शकते, याचीही या बैठकीत चाचणी होण्याची अपेक्षा आहे.







