दिल्ली-देहरादून एक्सप्रेसवेवर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. हरियाणातील बहादुरगड येथून हरिद्वारला दर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला. सहारनपूरजवळील हलगोया कट चालकाच्या लक्षात न आल्याने कार पुढे निघून गेली. त्यानंतर चालकाने पुढील सुरक्षित वळण घेण्याऐवजी भरधाव एक्सप्रेसवेवरच कार रिव्हर्स घेण्याचा धोकादायक निर्णय घेतला. याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओने कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि अपघातानंतर काही क्षण परिसरात एकच गोंधळ उडाला.
या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, रुग्णवाहिका आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमधील अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठे बचावकार्य राबवावे लागले.
हे ही वाचा:
पाकिस्तानने आधी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा, भारताकडून कडक समज
पाकिस्तानचे मेजर इक्बाल झोपलेत काय?
अरविंद केजरीवाल अमृतसरमध्ये बांधणार सीता माता, लवकुशचे मंदिर
जम्मूत नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स, पंतप्रधानांचे आभार
या संपूर्ण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून, त्यामध्ये कार रिव्हर्स घेत असतानाच मागून आलेली स्कॉर्पिओ वेगाने धडक देताना स्पष्ट दिसत आहे. हे दृश्य अत्यंत धक्कादायक असून महामार्गावरील वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास एका क्षणात किती मोठी जीवितहानी होऊ शकते, याची जाणीव करून देते. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. ही दुर्घटना प्रत्येक वाहनचालकासाठी गंभीर इशारा ठरत असून, एक्सप्रेसवेवर कट चुकल्यास कधीही रिव्हर्स न घेता पुढील अधिकृत एक्झिटचा वापर करणेच सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.







