अमेरिकन संसदेच्या काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसने (CRS) नुकत्याच तयार केलेल्या अहवालात इराण संघर्षादरम्यान अमेरिकेची सुमारे ४२ विमाने नष्ट झाली किंवा त्यांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी या अहवालाला तेहरानकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या दाव्यांची पुष्टी असल्याचे म्हटले आहे.
१३ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या CRS अहवालाचा उल्लेख करत अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, “इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर अनेक महिन्यांनी अमेरिकन काँग्रेसने अब्जावधी डॉलर किमतीची विमाने गमावल्याचे मान्य केले आहे.” अराघची यांच्या मते, यामुळे इराणच्या सशस्त्र दलांकडे एफ-३५ सारखी अत्याधुनिक विमाने पाडण्याची क्षमता असल्याचे स्पष्ट होते. त्यांनी इशारा देत म्हटले की, या संघर्षातून मिळालेला धडा असा आहे की भविष्यातील युद्धात आणखी धक्कादायक घडामोडी पाहायला मिळू शकतात.
CRS च्या अहवालानुसार, ४२ विमानांच्या नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकतो, कारण अनेक प्रकरणांची माहिती अद्याप गोपनीय असून विविध स्रोतांकडून नुकसानीची पडताळणी सुरू आहे. या विमानांमध्ये चार एफ-१५ई स्ट्राइक ईगल लढाऊ विमाने, एक एफ-३५ए लाइटनिंग II लढाऊ विमान, एक ए-१० थंडरबोल्ट II जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करणारे विमान, सात केसी-१३५ स्ट्रॅटोटँकर हवेत इंधन भरणारी विमाने, एक ई-३ सेंट्री एडब्ल्यूएसीएस विमान, दोन एमसी-१३०जे कमांडो II विशेष कृती विमाने, एक एचएच-६०डब्ल्यू जॉली ग्रीन II हेलिकॉप्टर, २४ एमक्यू-९ रीपर ड्रोन आणि एक एमक्यू-४सी ट्रायटन ड्रोन यांचा समावेश आहे.
काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिस ही अमेरिकन संसद आणि तिच्या समित्यांना कायदेशीर व धोरणात्मक विश्लेषण पुरवणारी संस्था आहे. हा अहवाल अमेरिकन संरक्षण विभाग, अमेरिकन सेंट्रल कमांड आणि विविध माध्यमांच्या अहवालांच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
२०२१ हिंसाचारप्रकरणी तृणमूल नगरसेवक देबराज चक्रवर्ती पोलिसांच्या ताब्यात
पंतप्रधान मोदींकडून मेलोनी यांना ‘मेलोडी’ची भेट
पंतप्रधान मोदींना ‘गारुडी’ दाखवून नॉर्वेच्या वृत्तपत्राने ओलांडल्या मर्यादा
मिर्झापूरमध्ये ‘जिम जिहाद’ प्रकरणात इमरान खानसह १० आरोपींवर गँगस्टर ऍक्ट लागू
अहवालात नमूद करण्यात आले आहे की अमेरिकन सैन्याला ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’दरम्यान हे नुकसान सहन करावे लागले. ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ हे २८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेले ४० दिवसांचे अमेरिका-इस्रायल संयुक्त हवाई अभियान होते. अहवालानुसार, १२ मे २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत पेंटागॉन नियंत्रक ज्युल्स डब्ल्यू. हर्स्ट तिसरे यांनी साक्ष देताना सांगितले की, इराणमधील लष्करी कारवायांसाठीचा खर्च वाढून २९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. मात्र, पेंटागॉनने अद्याप एकूण नुकसानीची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.







