पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय आणि आर्थिक घडी विस्कटली आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील हंगामी सरकारने बलुचिस्तान प्रांतातील पेट्रोल पंपांवर कारवाई करत ते तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या पेट्रोल पंपांवरून नागरिकांना कमी किमतीचे इराणी पेट्रोल विकले जात होते. त्यामुळे स्थानिक तेलशुद्धीकरण कंपन्यांना आर्थिक फटका बसल्याचे सांगण्यात येत आहेत. पाकिस्तानमधील हालाकीच्या आर्थिक स्थितीत देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.
पाकिस्तानमधील तेल कंपन्यांमधून पुरवठा होत असलेल्या इंधनापेक्षा इराणमधून आणलेले इंधन कमी किमतीत मिळते. त्यामुळे बलुचिस्तानमधील अनेक पंपमालक इराणमधून तस्करीच्या मार्गाने आणलेले पेट्रोल आणि डिझेल ग्राहकांना कमी किमतीत विकत होते. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असल्याने येथे महागाईही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे असे तस्करीचे पेट्रोल विकणाऱ्या ५०० कंपनींवर कारवाई करण्यात आली असून पेट्रोल पंप तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कमी किमतीत इंधन मिळत असल्याने तेच इंधन वापरण्यास वाहनचालक प्राधान्य देत होते. मात्र, त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांचे मोठे नुकसान होऊन सरकारचाही महसूल बुडत होता. सरकारने इराणी इंधन विकणाऱ्या पंपांविरोधात कारवाई केली, अशी माहिती बलुचिस्तानचे हंगामी माहिती मंत्री जान अचाकझाई यांनी दिली.
पाकिस्तानच्या सरकारी कंपन्यांद्वारे पुरविल्या जाणाऱ्या इंधनाचे दर मात्र सध्या गगनाला भिडले असून ३३० रुपये प्रतिलिटर या दराने विकले जात आहे. आर्थिक मदत करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने घातलेल्या अटीनुसारच हे दर वाढविण्यात आले आहे. इराणी इंधन तुलनेने स्वस्त म्हणजे २२० ते २३० रुपये प्रतिलिटर या दराने मिळत होते.
हे ही वाचा:
संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचे ठरणार
बेस्ट बसमध्ये पैसे विसरणारे प्रवासी वाढले; चार वर्षांत ८ हजार छत्र्याही लोक विसरले
भारताने आठव्यांदा जिंकला आशिया चषक
‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?
बलुचिस्तान प्रांतालाच लागून इराणची सीमा आहे. या सीमेवरून इंधनाची तस्करी केली जाते. ५० ते १०० लिटर क्षमतेच्या कॅनमध्ये इंधन भरून ते इराणमधून बलुचिस्तानमध्ये मालवाहू मोटारींद्वारे आणले जाते. येथून ते इंधन बलुचिस्तानमधील पंपांवर आणि कराचीसह मोठ्या शहरांत नेले जाते. बलुचिस्तानमध्ये या इंधनाची खुल्या पद्धतीने विक्री होत होती. इराण हा तेल उत्पादक देश असल्याने तस्करांना इराणमधून २० ते ३० रुपये प्रतिलिटर इंधन मिळते.