पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्यावर असताना अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जेडी व्हान्स यांच्या मुलांना काही भेटवस्तू दिल्या ज्या त्यांच्या मुलांना आवडल्याचे व्हान्स यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समधील त्यांच्या दुसऱ्या दिवशी, जेडी व्हन्स यांची भेट घेतली. जेडी व्हान्स हे ही स्वतः फ्रान्स दौऱ्यावर होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी जेडी व्हान्स यांचा मुलगा विवेक व्हान्स याला लाकडी रेल्वे खेळण्यांचा सेट दिला तर, इवान व्हान्स याला भारतीय लोकचित्रे असलेले जिगसॉ पझल भेट दिले. लाकडी रेल्वे ही जुन्या काळातील आठवण असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही रेल्वे गाडी नैसर्गिक लाकडापासून बनवलेली असून पर्यावरणपूरक वनस्पती रंगांनी रंगवलेली आहे. लहान मुलांच्या वापरासाठी अत्यंत सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी भेट दिलेल्या जिगसॉ पझलमध्ये भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाचे दर्शन घडते. यामध्ये पश्चिम बंगालमधील कालीघाट पट चित्रकला, संथाल चित्रकला आणि बिहारमधील मधुबनी चित्रकला यासह विविध लोक चित्रकला शैली प्रदर्शित केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी अधोरेखित केले की, यातील प्रत्येक शैली ही भारताच्या विविध सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडवते. शिवाय या पझलमुळे कलात्मक आणि शैक्षणिक अनुभव दोन्ही मिळतात. व्हान्स यांची मुलगी मिराबेल रोझ व्हान्स हिला पंतप्रधान मोदींनी पर्यावरणपूरक असा लाकडी वर्णमाला संच भेट दिला. टिकाऊ, सुरक्षित आणि आकर्षक अशा प्रकारचे त्याला डिझाइन केलेले आहे.
हे ही वाचा:
निवडणुक अर्जात खरी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस
युक्रेन- रशिया युद्ध संपणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा चर्चेसाठी पुढाकार
वादानंतर समय रैनाने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो चे सर्व व्हिडीओ हटवले
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये झालेल्या एआय समिटनंतर जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. कुटुंबासमवेत भेट घेतल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्णन दयाळू व्यक्ती असे केले. तसेच मुलांना भेटवस्तू आवडल्या असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक्सवर यासंदर्भात पोस्ट केली होती. “अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत खूप छान भेट झाली. विविध विषयांवर आमची खूप छान चर्चा झाली. त्यांचा मुलगा विवेकचा आनंददायी वाढदिवस साजरा करण्यात त्यांच्यासोबत सामील होऊन आनंद झाला!” असे पंतप्रधान मोदींनी लिहिले होते.







