जम्मू- काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सिंधू नदीचे पाणी थांबवणे, पाकिस्तानी नागरिकांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवणे, हवाई हद्द बंद करणे असे काही धडाकेबाज निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानला आता भारताने आणखी एक जबरदस्त दणका दिला आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानचे आर्थिक कंबरडे मोडण्याच्या दृष्टीने भारताने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर तात्काळ बंदी घातली आहे. वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. पाकिस्तानमधून थेट आयात कमी असली तरी, काही वस्तू अप्रत्यक्ष मार्गांनी किंवा तिसऱ्या देशांद्वारे देशात येत होत्या. वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, परराष्ट्र व्यापार धोरणात (FTP) नव्याने जोडलेल्या तरतुदीमध्ये “पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानमध्ये उद्भवणाऱ्या किंवा निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूकीवर तात्काळ बंदी” घालण्याचा उल्लेख आहे.
राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) म्हटले आहे. “पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या किंवा पाकिस्तानशी संबंधित कोणत्याही वस्तूंची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतूक, मुक्तपणे आयात करण्यायोग्य असो वा नसो, पुढील आदेश येईपर्यंत तात्काळ प्रतिबंधित असेल,” असे अधिसूचनेत म्हटले आहे. या बंदीला कोणताही अपवाद असल्यास भारत सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असेल. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील एकमेव व्यापारी मार्ग वाघा-अटारी क्रॉसिंग आधीच बंद करण्यात आला होता.
Direct or indirect Import or transit of all goods originating in or exported from Pakistan, whether or not freely importable or otherwise permitted, shall be prohibited with immediate effect. pic.twitter.com/KBamc3DhdW
— ANI (@ANI) May 3, 2025
हे ही वाचा..
संभलमधील सीओ अनुज चौधरी यांची बदली
काँग्रेस वर्किंग कमिटी आता पीडब्ल्यूसी झाली
“स्वतः सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात जाण्यास तयार…” कर्नाटकच्या मंत्र्यांनी का केले असे विधान?
पाकिस्तानमधून होणारी आयात प्रामुख्याने औषध उत्पादने, फळे आणि तेलबियांची होती. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी उत्पादनांवर २००% कर लादल्यानंतर गेल्या काही वर्षांत त्यात घट झाली. अहवालानुसार २०२४-२५ मध्ये एकूण आयातीच्या ती ०.०००१% पेक्षा कमी होती.







