येमेनमध्ये सौदी अरबच्या नेतृत्वातील येमेन सैन्य छावणीवर हूती बंडखोरांनी मोठा हल्ला केला. यात या छावणीतील जवळपास ३० सैनिकांचा मृत्यू झालाय, तर ६० जवान जखमी आहेत. हा हल्ला करण्यात आलेली छावणी सौदी अरबच्या नेतृत्वातील संयुक्त सेनेशी संबंधित होती. येमेनमधील साउदर्न फोर्सचे प्रवक्ते मोहम्मद अल-नकीब यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिलीय. हूती बंडखोरांनी रविवारी (२९ ऑगस्ट) अल-अनद सैन्य छावणीवर हल्ला केला. ही छावणी सरकारच्या नियंत्रणातील दक्षिणी प्रांत लाहिजोमध्ये आहे.
हूती बंडखोरांनी या हल्ल्यासाठी सशस्त्र ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाईलचा वापर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सैन्य छावणीत सकाळच्या वेळी अनेक सैनिक त्यांचं प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी एक बॅलेस्टिक मिसाईल छावणीतील प्रशिक्षण विभागावर कोसळलं. यात या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक सैनिकांचा मृत्यू झाला.”
या छावणीतील जखमींना वाचवण्यासाठी मदत मोहिम सुरू आहे. मात्र, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्यांची संख्या अधिक असल्यानं मृत सैनिकांचा आकडा वाढण्याची भीती आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाल्यानंतर छावणीतील स्थिती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे या छावणीवर पुन्हा हल्ला होण्याचाही धोका आहे. दरम्यान, सैनिक हल्ल्यात जखमी झालेल्या सहकारी सैनिकांनी दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत.
आजूबाजूला राहणाऱ्या लोकही या स्फोटाचा आवाज ऐकून चांगलेच हादरले. वादग्रस्त शहर तैजमधील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील हूती नियंत्रित भागात बॅलेस्टिक मिसाईल सोडल्याचा आवाज ऐकू आला होता. असं असलं तरी हूती बंडखोरांकडून या हल्ल्यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सौदीच्या नेतृत्वातील संयुक्त सैन्य आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त सरकारला पाठिंबा देत हूतीविरोधात लढत आहे. दुसरीकडे इराणचा सहकारी हूती २०१४ मध्ये या युद्धात सहभागी झालाय. म्हणजेच येमेनच्या राजधानीवर बंडखोरांनी ताबा मिळवल्यापासून हूती या युद्धात उतरलेत.
हे ही वाचा:
भारताला पॅरालिम्पिकमध्ये भरघोस यश
ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?
जन धनधनाधन; योजनेचा लाखो कुटुंबियांना लाभ
सौदी अरब आणि संयुक्त अरब अमीरातच्या नेतृत्वातील संयुक्त सैन्याने मार्च २०१५ मध्ये येमेनमध्ये अब्द-रब्बू मंसूर हादी यांच्या सरकारला सत्ता देण्यासाठी सैन्य हस्तक्षेप केला. मात्र, त्यानंतर या भागात मोठा संघर्ष उभा राहिलाय. यात आतापर्यंत हजारो सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय. या घटनाक्रमातूनच जगातील सर्वात मोठं मानवी संकट उभं ठाकलं आहे.







