भारतासोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे (UNSC) दरवाजे ठोठावले होते. भारताची कोंडी करता येईल या उद्देशाने पाकिस्तानने विनंती करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बंद दाराआड बैठक बोलावली होती. परंतु या बैठकीमध्ये पाकिस्तानचा डाव त्यांच्यावरचं उधळल्याचे समोर आले आहे.
सोमवार, ५ मे रोजी, बंद दाराआड संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची सल्लामसलत बैठक झाली जिथे सदस्य देशांनी पाकिस्तानलाचं कठीण प्रश्न विचारले. पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचा खोटारडा दावा, की हा हल्ला भारताने केला होता हे मान्य करण्यास इतर सदस्य देशांनी नकार दिला. सुरक्षा परिषदेचा सध्याचा तात्पुरता सदस्य असलेल्या पाकिस्तानला, पाकिस्तानशी खोल संबंध असलेली प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असण्याची शक्यता आहे का? असा सवालही करण्यात आला. ‘एएनआय’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा व्यापक निषेध करण्यात आला आणि काही सदस्यांनी विशेषतः पर्यटकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या आधारावर लक्ष्य करण्याचा मुद्दा उपस्थित केला. अनेक सदस्यांनी चिंता व्यक्त केली की पाकिस्तान क्षेपणास्त्र चाचण्या करून आणि अण्वस्त्रांबद्दल वारंवार विधाने करून तणाव वाढवत आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पाकिस्तानला काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आणून त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करायचे होते. पण पाकिस्तानचे हे प्रयत्नही अयशस्वी झाले आहेत. सुरक्षा परिषदेने त्यांना भारतासोबत बसून द्विपक्षीय पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला आहे. एकूणच या बैठकीतून पाकिस्तानच्या हाती काहीही लागले नसून आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली.
हे ही वाचा..
जातीगणनेबाबत खर्गे यांच्याकडून पंतप्रधानांना पत्र
गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक सुरू
पहलगाम हल्ला : शिकारा मालक संकटात
भारतामध्ये ५ जी फोन सेगमेंटमध्ये १०० टक्के वाढ
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर ही बैठक झाली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती अलिकडच्या काळात सर्वात वाईट पातळीवर पोहोचली आहे. सोमवारी दुपारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दीड तासांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर पाकिस्तानला लाजिरवाण्या भूमिकेचा सामना करावा लागला. या बैठकीनंतर, संयुक्त राष्ट्रांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नाही किंवा कोणताही ठराव मंजूर झाला नाही.







