नेपाळमध्ये अलीकडेच उसळलेल्या हिंसक निदर्शनांनंतर देशात हळूहळू शांतता प्रस्थापित होत असली, तरी त्या हिंसाचारात काही गंभीर घटना घडल्या आहेत. जनरल-झेड (Gen Z) युवकांच्या आंदोलनादरम्यान राजधानी काठमांडूमध्ये नेपाळचे माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांच्या घराला जमावाने आग लावली. या आगीत त्यांची पत्नी रवी लक्ष्मी चित्रकर गंभीररित्या भाजल्या गेल्या.
ही घटना ९ सप्टेंबर रोजी काठमांडूच्या दलू भागात घडली. निदर्शकांनी झलनाथ खनाल यांच्या घरावर हल्ला करून ते पेटवून दिले. आगीमध्ये अडकलेल्या रवी लक्ष्मी यांना वाचवण्यात आले, मात्र त्यांचे डावे हात पूर्णतः भाजले गेले असून, शरीराचा सुमारे १५ टक्के भाग जळाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
सुरुवातीला त्यांच्यावर नेपाळमधील कीर्तिपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र धुरामुळे त्यांच्या फुफ्फुसांवर परिणाम झाल्याने छातीत संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील अत्यवस्थ उपचारासाठी भारताची राजधानी दिल्ली येथे हलवण्यात आले आहे.
हे ही वाचा :
कुशल भारतीयांसाठी जर्मनीची दारे खुली! भारतातील जर्मन राजदूत असे का म्हणाले?
स्वतःच्या लोकांवर बॉम्बस्फोट करण्यापासून वेळ मिळाला की “हे” काम करा!
या विरोधकांपेक्षा अभिषेक शर्मा बरा!
पाकिस्तानच्या अपयशाचा आणखी एक पुरावा !
झलनाथ खनाल यांनी फेब्रुवारी ते ऑगस्ट २०११ दरम्यान नेपाळचे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या कुटुंबावर झालेला हा हल्ला नेपाळी राजकारणातील अस्थिरतेकडे आणि सामाजिक असंतोषाकडे स्पष्ट इशारा देतो. दरम्यान, जेन-झीच्या आंदोलनानंतर नेपाळमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून सध्या शांततेचे वातावरण आहे.







