दक्षिण अमेरिकेतील दुर्मिळ पक्ष्यांच्या शोधासाठी निघालेल्या एका डच पक्षीतज्ज्ञाच्या प्रवासाने अखेर जागतिक आरोग्य यंत्रणांची चिंता वाढवली आहे. नेदरलँड्सचे प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ लिओ शिलपेरोर्ड यांना आता एमव्ही होंडियस या आलिशान क्रूझ जहाजावरील हंता व्हायरस उद्रेकातील ‘पेशंट झिरो’ म्हणून ओळखण्यात आले आहे. पेशंट झिरो म्हणजे कोणत्याही आजाराचा पहिला रुग्ण असतो.
७० वर्षीय लिओ शिलपेरोर्ड आणि त्यांची पत्नी मिरजाम शिलपेरोर्ड हे अनेक महिन्यांपासून दक्षिण अमेरिकेत पक्षीनिरीक्षणासाठी फिरत होते. मार्चच्या अखेरीस त्यांनी उशुआया परिसरातील एका लँडफिल भागाला भेट दिली होती. हा भाग दुर्मिळ पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असला, तरी तिथे उंदरांचा मोठा वावर असल्याने हंता व्हायरसचा धोका देखील असल्याचे तपासात समोर आले आहे. संक्रमित उंदरांच्या विष्ठेतील सूक्ष्म कण श्वासावाटे शरीरात गेल्याने संसर्ग झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा:
वादग्रस्त हुमायून कबीर आता नवे मुख्यमंत्री शुभेंदूना देतायत धमकी
१३ वर्षांत भाजपाचे ७७३ वरून १८०५ आमदार
हिमंता बिस्वसर्मा झाले भाजपा, एनडीए विधिमंडळ पक्षाचे नेते
सातवे सोनेरी पान लिहीले जात आहे…
यानंतर १ एप्रिल रोजी हे दाम्पत्य एमव्ही होंडियस या क्रूझ जहाजावर चढले. या जहाजावर १०० हून अधिक प्रवासी होते, ज्यात वैज्ञानिक आणि पक्षीनिरीक्षकांचाही समावेश होता. प्रवासादरम्यान लिओ यांना ताप, डोकेदुखी आणि पोटदुखीची लक्षणे दिसू लागली. काही दिवसांतच त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि ११ एप्रिलला जहाजावरच त्यांचा मृत्यू झाला.
सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असे मानले गेले. मात्र नंतर तपासात हंता व्हायरस संसर्ग स्पष्ट झाला आणि तेच या उद्रेकाचे पहिले रुग्ण असल्याचे निश्चित करण्यात आले.
लिओ यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी मिरजाम जहाजावरून उतरून दक्षिण आफ्रिकेत गेल्या. मात्र तिथेही त्यांची प्रकृती खालावली आणि नेदरलँड्सला परतण्याच्या प्रयत्नात त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर जागतिक आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.
या उद्रेकात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवाशांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळली आहेत. तज्ज्ञांच्या मते, हा ‘अँडीज’ प्रकारचा हंता व्हायरस असू शकतो, जो माणसातून माणसात पसरण्याची मर्यादित क्षमता असलेला दुर्मिळ प्रकार मानला जातो. जागतिक आरोग्य संघटना ने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोविडसारखा वेगाने पसरणारा नसला, तरी योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.







