भारतासोबतच्या अलिकडच्या संघर्षावर आपली बाजू मांडण्यासाठी पाकिस्तान सरकारने आपले शिष्टमंडळ परदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यासाठी पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांची निवड केली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आणि दहशतवादाविरोधात भारताच्या ‘शून्य सहिष्णुता’ धोरणाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी भारत सरकारने सात भारतीय खासदारांचे एक प्रतिनिधिमंडळ परदेशात पाठवत असल्याची घोषणा करताच पाकिस्तानकडून ही घोषणा करण्यात आली.
बिलावल भुट्टो यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘पंतप्रधानांनी मला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर शांततेसाठी पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. ही जबाबदारी स्वीकारण्याचा मला सन्मान वाटतो आणि या आव्हानात्मक काळात पाकिस्तानची सेवा करण्यास मी वचनबद्ध आहे. दरम्यान, या घोषणेमुळे पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताची नक्कल केल्याचे दिसत आहे.
भारतासोबतच्या अलिकडच्या संघर्षांमध्ये पाकिस्तानने अनेक वेळा भारताचे अनुकरण केले आहे. अलिकडेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सियालकोटमधील लष्करी तळाला भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसला भेट देऊन सैनिकांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी हे केले. पंतप्रधान मोदी सैनिकांना संबोधित करत असताना, शाहबाज शरीफ यांनीही पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांना संबोधित केले.
दरम्यान, केंद्र सरकारने काल ५९ सदस्यीय शिष्टमंडळाची घोषणा केली. यामध्ये ५१ नेते आणि ८ राजदूतांचा समावेश आहे. तर एनडीएचे ३१ आणि इतर पक्षांचे २० आहेत, ज्यामध्ये ३ काँग्रेस नेते आहेत. या शिष्टमंडळाची ७ गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात एका खासदाराला नेता बनवण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसचे शशी थरूर, भाजपचे रविशंकर प्रसाद, जेडीयूचे संजय कुमार झा, भाजपचे बैजयंत पांडा, डीएमकेच्या कनिमोळी करुणानिधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे.







