भारत आणि आर्मेनियाने एकत्र येऊन ११ वा फॉरेन ऑफिस कन्सल्टेशन (एफओसी) आयोजित केला. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा परामर्श येरेवन येथे पार पडला, जिथे दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंवर तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर चर्चा केली. भारत आणि आर्मेनियाने सहकार्याच्या विविध क्षेत्रांबरोबरच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही विचारांची देवाणघेवाण केली. भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम विभाग) सिबी जॉर्ज यांनी केले, तर आर्मेनियाच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व उप-परराष्ट्र मंत्री मनत्सकन सफरयान यांनी केले.
सिबी जॉर्ज यांनी आर्मेनियाचे परराष्ट्र मंत्री अरारात मिर्जोयान यांचीही भेट घेतली. या बैठकीदरम्यान भारताच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आणि आर्मेनियाच्या आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्याचा करार केला. या करारावर भारताच्या येरेवन येथील राजदूत नीलाक्षी साहा सिन्हा आणि आर्मेनियाच्या उप-आरोग्य मंत्री लीना नानुश्यान यांनी स्वाक्षऱ्या केल्या. पुढील म्हणजेच २०२६ मधील एफओसी बैठक भारतात सोयीस्कर तारखेला आयोजित केली जाईल.
हेही वाचा..
अनंतनागमधील माजी सरकारी डॉक्टरकडे सापडली एके- ४७
भारताचा स्मार्टफोन बाजार गतीने वाढण्यासाठी सज्ज
कुलगाम, डोडामध्ये दहशतवादी नेटवर्कवर प्रहार
शिक्षिकेचे तक्रारीकडे दुर्लक्ष आणि नऊ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; नेमकं प्रकरण काय?
याआधी, एफओसीची मागील बैठक नोव्हेंबर २०२३ मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती. गेल्या महिन्यात सिबी जॉर्ज यांनी नवी दिल्लीतील आर्मेनियाच्या राष्ट्रीय दिन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्या वेळी त्यांनी पश्चिम आशियातील या देशाशी भारताच्या मैत्रीपूर्ण संबंधांना अधिक बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर (एक्स प्लॅटफॉर्मवर) पोस्ट करत म्हटले होते, “सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज यांनी आर्मेनिया प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय दिवस सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी इतिहासात रुजलेल्या भारत-आर्मेनिया मैत्रीच्या दीर्घकालीन नात्याबद्दल भारताची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली, जी दोन्ही देशांच्या नेतृत्वामधील अलीकडच्या उच्चस्तरीय संवादावर आधारित आहे.”
याआधी, ऑगस्ट महिन्यात चीनमध्ये झालेल्या एससीओ शिखर परिषदे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी, मार्च महिन्यात आर्मेनियाचे परराष्ट्र मंत्री अरारात मिर्जोयान भारत दौर्यावर आले होते आणि त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली होती. पंतप्रधान मोदी यांनी ऑगस्टमधील आपल्या भेटीनंतर सोशल मीडियावर लिहिले होते, “आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिन्यान यांच्यासोबत अतिशय चांगली चर्चा झाली. भारत आणि आर्मेनियामधील संबंध आत्मीय, मजबूत आणि परस्पर सहकार्यावर आधारित आहेत.”







