इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC)च्या गुप्तचर विभागाचे प्रमुख मेजर जनरल खादेमी यांचे निधन झाले आहे. इराणी सरकारी माध्यमांनी याची अधिकृत पुष्टी केली आहे. इराणने या हल्ल्यासाठी अमेरिका आणि इस्रायलला जबाबदार धरत, देश अस्थिर करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे. आयआरजीसीच्या जनसंपर्क विभागाने सोमवारी याबाबत घोषणा केली.
जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, मेजर जनरल खादेमी यांनी गुप्तचर आणि सुरक्षा क्षेत्रात सुमारे अर्धशतक प्रामाणिकपणे आणि धैर्याने सेवा बजावत क्रांती, शासन आणि इस्लामी मातृभूमीच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण, दीर्घकालीन आणि आदर्श योगदान दिले. तस्नीम न्यूज एजन्सीनुसार, खादेमी यांच्या मृत्यूला ‘क्रांतीची हत्या’ असे संबोधण्यात आले असून, एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या गुप्तचर शाखेचे प्रभावी आणि सुशिक्षित प्रमुख ब्रिगेडियर खादेमी सोमवारी सकाळी अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात शहीद झाले.
इराणने खादेमी यांच्या मृत्यूला मोठे नुकसान मानत, त्यांच्या वारशातून देशाच्या सुरक्षा धोरणांना पुढेही दिशा मिळत राहील असे म्हटले आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. दरम्यान, इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनीही खादेमी यांच्या मृत्यूची पुष्टी करत आपल्या सैन्याच्या कारवाईचे कौतुक केले. ‘द टाइम्स ऑफ इस्रायल’ने दिलेल्या माहितीनुसार, आयडीएफचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल आयाल झमीर यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीदरम्यान या हल्ल्याची माहिती देण्यात आली.
हे ही वाचा:
हिंदूंच्या शोभायात्रेवर हल्ला करणाऱ्यांचे घर जमीनदोस्त, गोरेगावात राडा
अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी १० ठिकाणी छापे
अमेरिकन वैमानिकाच्या सुटकेसाठी ३६ तासांची मोहीम; इराणमधून कसे काढले बाहेर?
गॅस सिलेंडर चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ४५ सिलेंडर आणि ३ दुचाकी जप्त
इराणमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मृत्यूची ही नव्याने सुरू झालेली मालिका मानली जात आहे. २८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संघर्षाला आता महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. सुरुवातीच्या यूएस-इस्रायल हवाई हल्ल्यातच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यासह अनेक वरिष्ठ कमांडर्सही ठार झाले. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रमुख अली लारीजानी, नौदल कमांडर अलीरेझा तंगसीरी, ब्रिगेडियर जनरल आणि चीफ ऑफ जनरल स्टाफचे सल्लागार जमशेद इशाकी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या मृतांमध्ये समावेश आहे.







