युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्यात FPV ड्रोनचा वापर करण्यात आला. हे सगळे ड्रोन आधीच निर्धारित लक्ष्याच्या भागात ठेवण्यात आल्या होत्या.
आता या हल्ल्याची योजना कशी आखण्यात आली आणि ड्रोन हवाई तळांपर्यंत कसे पोहोचले याची सविस्तर माहिती समोर आली आहे.
आधीच ड्रोन रशियात पोहोचले होते
युक्रेनने फर्स्ट पर्सन व्ह्यू (FPV) ड्रोन वापरले, जे ऑपरेटरला कॅमेर्याच्या माध्यमातून ड्रोनसमोर काय आहे ते थेट पाहण्याची सुविधा देतात. विमान दिसताच ड्रोनवर लावलेल्या शस्त्रांद्वारे अत्यंत जवळून अचूक हल्ला केला जात होता. हे ड्रोन बरेच आधी रशियामध्ये गुप्तपणे नेण्यात आले होते. ते लाकडी केबिन्समध्ये लपवण्यात आले होते, ज्या ट्रकच्या छतावर ठेवण्यात आल्या होत्या. या केबिन्सच्या छतावर एक झाकण होते, जे दूरवरून उघडता येते.
युक्रेनच्या सिक्युरिटी सर्व्हिस (SBU) ने प्रथम ड्रोन रशियात पाठवले. नंतर मोबाईल लाकडी केबिन्स वेगळ्या वेळी पाठवण्यात आल्या. रशियात पोहोचल्यानंतर ड्रोन केबिन्सच्या छतावरील गुप्त कप्प्यात ठेवण्यात आले आणि नंतर त्या केबिन्स ट्रॅक्टर-ट्रेलर ट्रकमध्ये लोड करण्यात आल्या. फोटोंमध्ये या केबिन्समधील छतावर एकापेक्षा एक रांगेत ड्रोन ठेवलेले दिसतात.
SBU ने स्थानिक नागरिकांना ड्रायव्हर म्हणून काम दिले. त्यांना कदाचित कळलेही नाही की ते काय वाहत आहेत, कारण ड्रोन केबिन्सच्या छतावर लपवले गेले होते, आत नव्हे. ड्रायव्हरने निर्दिष्ट ठिकाणी ट्रक उभा केल्यानंतर त्यांना तिथून निघून जाण्यास सांगितले गेले. जेव्हा सर्व ट्रक्स बेलाया, डायघिलेवो, ओलेन्या आणि इव्हानोव्हो येथील हवाई तळांजवळ पोहोचले, तेव्हा ऑपरेशन सुरू करण्यात आले.
योग्य वेळी, SBU ने ट्रक्सच्या छतावरील झाकण दूरवरून उघडले आणि एकामागोमाग एक ड्रोन बाहेर येऊ लागले, जे पाहून स्थानिक नागरिक चकित झाले. युक्रेनने दिलेल्या फुटेजमध्ये ड्रोन कॅमेर्यातून रशियन बॉम्बर्स आणि इतर विमानांच्या ओळी दिसतात आणि ऑपरेटर त्यांच्यावर अचूक हल्ला करत आहे.
इरकुट्स्कचे गव्हर्नर इगोर कोबझेव यांनी पुष्टी केली की सिबेरियातील स्रेद्नी लष्करी तळावर हल्ला करणारे ड्रोन एका ट्रकमधून लॉन्च करण्यात आले. परंपरागत महाग UAV ड्रोन हजारो फुटांवरून मॅपिंग करत असल्यामुळे प्रत्यक्ष लक्ष्य धूसर दिसते. पण युक्रेनचे कमी खर्चाचे ड्रोन काही फुटांवरून हल्ला करीत असल्यामुळे लक्ष्य स्पष्ट आणि अचूक दिसत होते.
युक्रेनने केवळ ड्रोनहल्ल्यांवरच नाही, तर ट्रक्सबाबतही योजना आखली होती. हॉलिवूड स्टाईल धक्कादायक कृतीत त्यांनी हे ट्रकही स्फोटकांनी भरले होते.
हे ही वाचा:
ममता कुलकर्णीचे नाव यमाई ठरल होत म्हणे !
प्रयागराज: कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क
पीयूष गोयल यांच्या पॅरिस दौऱ्यातून काय साध्य होणार ?
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर जोरदार प्रहार
ड्रोन वाहून नेणारे ट्रक्सही स्फोटात उडाले
जेव्हा रशियन फोर्सेसने ड्रोन उडून गेल्यानंतर ट्रक्स उघडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते ट्रक प्रचंड स्फोटात उडाले. एका उत्सुक ड्रायव्हरने परत जाऊन पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो स्फोटात ठार झाला. या हल्ल्याचे कोडनाव ऑपरेशन स्पायडरवेब होते. युक्रेनने सांगितले की, याची योजना १ ते १.५ वर्षांपासून आखली जात होती. या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले मुख्य लोक आधीच युक्रेनमध्ये परतले होते, त्यामुळे रशियाला केवळ ड्रायव्हर किंवा ट्रक्सशी संबंधित लोकांनाच अटक करता येईल – आणि त्यांना खरेच ऑपरेशनबद्दल काहीच माहिती नव्हती.
युक्रेनने रशियात आतूनच ड्रोन लाँच करून ४० पेक्षा अधिक लष्करी विमाने उडवली. त्यामध्ये Tu-95, Tu-22M3 बॉम्बर्स आणि एक A-50 एअरबोर्न वॉर्निंग विमान समाविष्ट होते. ही विमाने आता उत्पादनात नसल्यामुळे त्यांची तातडीने भरपाई करता येणार नाही. SBU च्या अंदाजानुसार रशियाचे एकूण नुकसान $2 अब्जांहून अधिक झाले आहे.







