छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातून एक आनंदाची बातमी आली आहे. येथे १६ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. या सर्वांवर एकूण २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. यापैकी ९ नक्षलवादी चिंतलनार पोलीस स्टेशन परिसरातील केरळपेंडा गावातील रहिवासी आहेत. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे, केरळपेंडा गाव आता पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहे. दरम्यान, नक्षलवादापासून मुक्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत या गावाच्या ग्रामपंचायतीला विकास प्रकल्पांसाठी एक कोटी रुपये दिले जाईल.
याबाबत माहिती देताना सुकमा जिल्ह्याचे एसपी किरण चव्हाण म्हणाले, एका महिलेसह एकूण १६ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांनी पोलिस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. राज्य सरकारच्या ‘नियाद नेलनार’ (तुमचे चांगले गाव) योजनेमुळे प्रभावित होऊन या सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत, नक्षलमुक्त गावांमध्ये विकासकामांना चालना देणे हे उद्दिष्ट आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या सर्व नक्षलवाद्यांवर एकूण २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी दोघांवर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. रीता उर्फ दोडी सुक्की (३६) आणि राहुल पुनीम (१८) अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय, लेकम लखमा (२८) वर ३ लाख रुपये आणि इतर तीन नक्षलवाद्यांना प्रत्येकी २ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
दरम्यान, केरळपेंडा ही दुसरी ग्रामपंचायत आहे जी नक्षलमुक्त झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला ‘बडेसट्टी’ ग्रामपंचायत नक्षलमुक्त घोषित करण्यात आली होती. तिथेही सर्व नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केले होते.
हे ही वाचा :
कोलोरॅडोत इस्रायलींवर इस्लामी हल्ला, सुलेमानने केले आठ जणांना गंभीर जखमी,
‘वृक्षासन’ करा, तणाव आणि चिंता दूर होतील, आत्मविश्वासही वाढेल
श्रेयसच्या फटकेबाजीचा पाऊस, मुंबई वाहून गेली; पंजाब फायनलमध्ये
दरम्यान, सर्व आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना राज्य सरकारकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. याशिवाय त्यांचे पुनर्वसन केले जाईल. बस्तर परिसरात आतापर्यंत ७९२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. या क्षेत्रात एकूण सात जिल्हे समाविष्ट आहेत.
