आयपीएल २०२५ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या निर्णायक सामन्यात पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने नाबाद ८७ धावांची तुफानी खेळी करत संघाचा विजय सुनिश्चित केला.
मुंबईने प्रथम फलंदाजी करत ६ गडी गमावून २०३ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबने १९ व्या षटकात ५ गडी गमावून २०७ धावा करत सामना आपल्या बाजूने झुकवला.
पंजाबकडून श्रेयस अय्यरने केवळ ४१ चेंडूंमध्ये ८७ धावा केल्या. त्यांच्या खेळीत ८ षटकार आणि ५ चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, अय्यरने १९ व्या षटकात अश्विनी कुमारला सलग ४ षटकार ठोकत सामना संपवला. अय्यर आणि नेहल वढेरा (४८) यांनी चौथ्या गड्यासाठी ८४ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
याशिवाय प्रियांश आर्यने १० चेंडूंमध्ये २० धावा, तर जोश इंग्लिसने २१ चेंडूंमध्ये ३८ धावा करत अय्यरला उत्तम साथ दिली. प्रभसिमरन सिंग आणि शशांक सिंग अनुक्रमे ६ व २ धावांवर बाद झाले. मार्कस स्टॉयनिस २ धावांवर नाबाद राहिला.
मुंबई इंडियन्सकडून अश्विनी कुमारने २ बळी घेतले, तर ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी १ बळी घेतला. जसप्रीत बुमराहने ४ षटकांत ४० धावा दिल्या मात्र त्याला एकही बळी मिळवता आला नाही.
हे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले आहे की मुंबई इंडियन्सने २०० किंवा त्याहून अधिक धावा करूनही सामना गमावला.
मुंबईकडून तिलक वर्मा (२९ चेंडू, ४४ धावा), सूर्यकुमार यादव (२९ चेंडू, ४४ धावा), जॉनी बेअर्स्टो (२४ चेंडू, ३८ धावा) आणि नमन धीर (१८ चेंडू, ३७ धावा) यांनी उपयुक्त खेळी केली.
पंजाबकडून अजमतुल्लाह उमरजईने २ बळी घेतले, तर काईल जॅमिसन, मार्कस स्टॉयनिस, विजयकुमार वैशाख आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
श्रेयस अय्यरने आयपीएल इतिहासात एक विक्रमही केला आहे. ते आयपीएलमधील पहिले कर्णधार ठरले आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली ३ संघ अंतिम फेरीत पोहोचले – २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्स, २०२४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (विजेते) आणि आता २०२५ मध्ये पंजाब किंग्स.
आता ३ जून रोजी या मैदानावरच अंतिम सामना रंगणार असून पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आमने-सामने भिडतील. दोन्ही संघांनी अद्याप आयपीएल ट्रॉफी जिंकलेली नाही, त्यामुळे यंदा एक नवीन विजेता मिळणार हे निश्चित आहे.
