चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी ब्लूमबर्गला दिली. त्यात पाकिस्तान आणि काँग्रेसला अपेक्षित असलेला प्रश्न विचारला, ‘किती राफेल पाडली? यावर सीडीएस चौहान यांनी जे उत्तर दिले त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या काड्यांना पुन्हा जोर आलेला आहे. सीडीएस जे बोलले तो गौप्यस्फोट वगैरे अजिबात नव्हता. एअर मार्शल ए.के.भारती यांनी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना यावर प्रकाश टाकला होता. नुकसान हा युद्धाचा अविभाज्य घटक आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. सीडीएस यांनी तेच सांगितले, त्याचाही विपर्यास करण्यात आला.
लोकशाही व्यवस्था ही सर्वाधिक पारदर्शी मानली जाते. तुम्हाला तुमचे निर्णय जनतेला सांगावे लागतात, पटवून द्यावे लागतात. ते दडवून ठेवता येत नाहीत आणि ठरवले तरी दडून राहात नाहीत. तरीही काही अशा गोष्टी आहेतच ज्या झाकून ठेवण्याची गरज असते. ज्याबाबत वाच्यता केली जात नाही. गुप्तचर यंत्रणांकडे, सुरक्षा दलांकडे सिक्रेट फंड असतो. देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील असलेली माहिती मिळवण्यासाठी याचा वापर होतो. या फंडाचा तपशील कधीही उघड केला जात नाही. काँग्रेसचे थिल्लर नेते उद्या हा तपशीलही जाहीर करायला सांगतील. काँग्रेसला अशा माहितीत प्रचंड रस असतो. ही माहिती चव्हाट्यावर यावी यासाठी काँग्रेसचा सतत प्रयत्न सुरू असतो.
राफेलबाबत पाकिस्तानने एक प्रपोगंडा सुरू केला. त्यांची मजबुरी होती. त्यांना त्यांच्या जनतेला दाखवायचे होते की फक्त भारताने आम्हाला तुडवले नाही. आम्ही सुद्धा त्यांना दणका दिलेला आहे. हे चित्र निर्माण करण्यासाठी पाकिस्तानने काय काय केले पाहा. विजयी मिरवणुका काढल्या, पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी विजयी भाषण ठोकले. अन्य देशात जाऊन विजयाची टीमकी बाजवली. पडेल जनरल आसिफ मुनीर यांना फिल्ड मार्शलपदी बढती देण्यात आली. इतकंच काय या विजयाच्या आठवणी सतत ताज्या राहाव्यात म्हणून शहबाज शरीफ यांनी त्यांना युद्धाच्या एका फोटोची फ्रेम भेट दिली. नंतर उघड झाले की त्याचा ताज्या भारत पाक संघर्षाशी काडीचाही संबंध नाही. जगभरात हसे होत असताना पाकिस्तानचे नेते सातत्याने हे चाळे करत होते.
हे ही वाचा:
नीतीश कुमार यांनी निर्माणाधीन योजनाांची घेतली माहिती
प्रयागराज: कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क
राष्ट्रगीत म्हणणे सोडा साधे तोंडही हलवले नाही !
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर जोरदार प्रहार
पाकिस्तानचा प्रपोगंडा भारतात कुणी चालवला असेल तर काँग्रेसने. किती राफेल पडली हा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावून धरला होता. जयराम रमेश, मल्लिकार्जुन खरगे, सुप्रिया श्रीनेत, पवन खेरा, सगळेच हाच प्रश्न विचारतायत. याच दरम्यान अमेरिकी ब्लूमबर्गने अनिल चौहान यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे, की भारताची सहा राफेल पाडल्याचा पाकिस्तानचा दावा चुकीचा आहे. काँग्रेसच्या अपप्रचाराला त्यांनी उत्तर दिले होते. परंतु सोयीचे तेवढेच ऐकायचे हा काँग्रेसचा बाणा आहे.
‘जेट पाडली यापेक्षा सुरूवातीला आमच्या रणनीतीत काही चूक होती. आम्ही ती सुधारली आणि पाकिस्तानमध्ये खोलवर मारा केला.’ असे ते म्हणाले. काँग्रेसने त्याचा विपर्यास करायला सुरूवात केली. सीडीएस तेच म्हणाले जे एअर मार्शल ए.के.भारती यांनी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सांगितले होते. तेव्हाही त्यांनी सुचित केले होते की नुकसान झालेले आहे. परंतु ‘आम्हाला जे काही साध्य करायचे होते ते आम्ही साध्य केले’. भारतीय सेना दलांनी काय साध्य केले यात काँग्रेसला अजिबात रस नाही. त्यांना किती राफेल पाडली याची माहिती ओरडून ओरडून सांगायची आहे.
‘नुकसान हा युद्धाचा अविभाज्य घटक असतो’, असे ए.के.भारती म्हणाले होते. हे काय काँग्रेसला माहित नाही. १९७१ च्या युद्धातही भारतीय एअर फोर्सचे मोठे नुकसान झाले होते. युद्धात ते होतेच. ते महत्वाचे की पाकिस्तानचे आपण दोन तुकडे केले ते महत्वाचे.
लाल समुद्रात उच्छाद मांडणाऱ्या इराण समर्थक हुती बंडखोरांनी अमेरिकेच्या विरोधात संघर्ष सुरू ठेवला आहे. आता हे हुती बंडखोर म्हणजे येमेनचे अधिकृत सैन्य नाही. ही प्रोफेशनल आर्मी नाही. परंतु यांनी अमेरीकेच्या डोक्यावर मिऱ्या वाटल्या आहेत. हुती बंडखोरांसोबत सुरू असलेल्या संघर्षात स्वत:ला महासत्ता समजणाऱ्या अमेरिकेचे ७० दशलक्ष डॉलर्स किमतीच्या युद्ध सामुग्रीचे नुकसान झाले आहेत.
हुती बंडखोरांना केलेल्या माऱ्यात यांचे एफ१६ कसेबसे तळावर परतले. एफ३५ हे स्टेल्थ थोडक्यात बचावले. एफ३५ हे अमेरिकेचे नाक आहे. हे स्टेल्थ विमान अमेरिकेने युरोपातील अनेक देशांना विकले आहे. हेच स्टेल्थ भारताला विकण्याचे अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. तीन एफए १८ ई सुपर हॉर्नेट विमाने अमेरिकेने गमावली. त्यातले एक अमेरिकी नौदलाने चुकून उडवले. एक बंडखोरांनी पाडले. हॅरी ट्रूमन या विमानवाहू जहाजावर बंडखोरांनी डागलेले क्षेपणास्त्र चुकवताना एफए १८ ई सुपर हॉर्नेट हे विमान थेट समुद्रात कोसळले आणि थेट तळाला गेले. १५ एमक्यू९ रिपर ड्रोन पाडण्यात बंडखोरांना यश आले आहे. अमेरिकी शस्त्रांची ही रडकथा अमेरिकेच्या तमाम मीडियात प्रसिद्ध झालेली आहे.
ही सगळी ती युद्ध सामुग्री आहे, ज्याचा अमेरिका सगळ्या जगात डंका पिटत असते. जर मूठभर संख्या असलेले हुती बंडखोर अमेरिकेचे इतके नुकसान करीत असतील तर पाकिस्तानला चार दिवस एका पाठोपाठ एक दणके दिल्यानंतर भारताचे बिलकुल नुकसान होणार नाही, हे मानणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात वावरण्यासारखे आहे.
काँग्रेसचे छोटे, बडे, चिल्लर, कवडी दमडीचे असे सगळ्या प्रकारचे नेते सारखा तोच सवाल सरकारला करीत आहे. सरकार लपवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप करीत आहेत. मुळात ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर जी काही माहिती उघड करण्यात आली ती सेनाधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात आली. एकाही राजकीय नेत्याने अधिकृतपणे यावर भाष्य केलेले नाही. सरकारला जे काही सांगायचे होते, ते सेनाधिकाऱ्यांच्या मार्फत आपण सांगितले.
सेनाधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूर सुरू असताना नुकसान झाल्याचे मान्य केले. ए.के.भारती यांचे विधान सुस्पष्ट आहे. नुकसान हा युद्धाचा अविभाज्य घटक आहे. हे विधान शहाण्या लोकांना समजले. काँग्रेसच्या मुर्खांना समजले नाही. आपल्या सेनादलांनी पाकचे बारा वाजवले, याचा त्यांना अभिमान नाही. त्यांची लढाऊ विमाने, त्यांचे हवाई तळ, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा, त्यांचे अवॅक्स, त्यांची ड्रोन, त्यांची क्षेपणास्त्रे आपण सगळे काही उद्ध्वस्त केले. तरीही काँग्रेसवाले पाकिस्तानचा नरेटीव्ह चालवण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या हवाई तळावर जी चंद्र विवरे पडलेली आहेत, त्याबद्दल बोलण्यासाठी काँग्रेसची जीभ रेटत नाही. जेव्हा भारताचा चीनशी संघर्ष सुरू असतो तेव्हा काँग्रेसचे नेते चीनी सुरात सुर मिसळतात. पाकिस्तानशी संघर्ष सुरू असतो तेव्हा ते पाकिस्तानच्या सुरात सुर मिसळतात. हे एव्हाना भारतीयांच्या लक्षात आलेले आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
