जपानमध्ये जवळपास तीन दशकांपासून राहणारे एक भारतीय रेस्टॉरंट व्यावसायिक एका कार्यक्रमादरम्यान भावूक झाले. जपानच्या कडक करण्यात आलेल्या स्थलांतर नियमांमुळे त्यांचा बिझनेस मॅनेजर व्हिसा नूतनीकरण अर्ज नाकारण्यात आला आणि १८ वर्षे चालवलेले रेस्टॉरंट बंद करून भारतात परत जाण्यास सांगण्यात आल्याची वेदना त्यांनी व्यक्त केली.
मनीष कुमार हे जपानमधील सैतामा प्रीफेक्चरमध्ये भारतीय रेस्टॉरंट चालवतात. त्यांनी सांगितले की, जपानमधील सुधारित स्थलांतर नियमांनुसार त्यांचा अर्ज फेटाळला गेला. त्यामुळे त्यांना भारतात येण्याशिवाय पर्याय नाही.
१३ मे रोजी झालेल्या एका कार्यक्रमात भाषण करताना ते भावूक झाले आणि म्हणाले, “माझी मुले फक्त जपानी भाषा बोलतात… आणि आता आम्हाला भारतात परत जाण्यास सांगितले जात आहे.” या कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डोळ्यात अश्रू आणत कुमार यांनी जपानी भाषेत केलेल्या भाषणात म्हटले, “माझी मुले इथेच जन्मली आणि आता हायस्कूलमध्ये शिकत आहेत. त्यांना फक्त जपानी भाषा येते आणि त्यांचे मित्रही जपानीच आहेत. मी खूप मेहनत केली आणि घरही विकत घेतले. आता अचानक भारतात परत जा असे सांगणे मानवतेला धरून आहे का?”
त्यांनी असेही सांगितले की, स्थानिक प्रशासन, ग्राहक आणि समाजाच्या मदतीने त्यांनी जपानमध्ये आयुष्य उभे केले. “इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे,” असे ते म्हणाले. “मी काहीही चुकीचे केलेले नाही. नियम अचानक बदलले म्हणून लोकांना त्यांच्या मूळ देशात परत जा असे सांगणे अत्यंत क्रूर आहे.”
कुमार यांनी कायमस्वरूपी रहिवासी दर्जा किंवा जपानी नागरिकत्व घेण्याऐवजी दरवेळी व्हिसाचे नूतनीकरण केले होते. मात्र, नव्या नियमांनुसार ते आवश्यक अटी पूर्ण करू शकले नाहीत. टोकियोजवळील सैतामामधील त्यांचे करी रेस्टॉरंट अजून सुरू आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.
हे ही वाचा:
“बेकायदेशीर मध्यस्थता मान्य नाही” सिंधू जल करारावर भारत ठाम
“जग सध्या आपत्तींच्या दशकातून जातंय”
तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात सापडली बनावट आधार कार्डे
व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान, जल व्यवस्थापन; भारत–नेदरलँड्स सहकार्याचा विस्तार
भांडवली अट सहापट वाढवली
जपानने गेल्या वर्षाच्या शेवटी बिझनेस मॅनेजर व्हिसाचे नियम बदलले. अर्जदारांसाठी किमान भांडवलाची अट ५ दशलक्ष येनवरून ३० दशलक्ष येन (सुमारे १.९ लाख डॉलर्स) इतकी करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा व्हिसा स्थलांतरासाठी चुकीच्या पद्धतीने वापरला जात असल्याच्या चिंतेमुळे आणि या योजनेअंतर्गत बनावट कंपन्या चालवल्या जात असल्याच्या चौकशीनंतर हे बदल करण्यात आले.
केपीएमजीच्या अहवालानुसार, अर्जदार किंवा पूर्णवेळ कर्मचाऱ्यांना जपानी भाषेचे ज्ञान सिद्ध करणे आवश्यक आहे. साधारणपणे जेएलपीटी एन २ स्तराची पात्रता अपेक्षित आहे.
व्हिसा अर्जांमध्ये ९६ टक्के घट
जपानी माध्यमांच्या अहवालानुसार, सुधारित नियम लागू झाल्यानंतर बिझनेस मॅनेजर व्हिसासाठीचे अर्ज मोठ्या प्रमाणात घटले आहेत. या नियमांचा पुनर्विचार करण्याची मागणी करणाऱ्या Change.org वरील याचिकेला जवळपास ६० हजार स्वाक्षऱ्या मिळाल्या असून ती याचिका या आठवड्यात जपानच्या स्थलांतर सेवा संस्थेकडे सादर करण्यात आली.
किमी ओनोडा यांनी या कठोर नियमांचे समर्थन करताना म्हटले की, “या व्हिसाचा स्थलांतरासाठी गैरवापर केला जाऊ शकतो, ही चिंता आता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे.”
या घटनेनंतर जपानच्या स्थलांतर धोरणांबाबत आणि अनेक वर्षे देशात राहूनही कायदेशीर स्थिती अनिश्चित झालेल्या परदेशी नागरिकांच्या समस्यांबाबत सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
