संयुक्त अरब अमिरातची (यूएई) राजधानी अबूधाबीमध्ये पहिले भव्य हिंदू मंदिर उघडले जात आहे. या हिंदू मंदिराचे उद्घाटन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
मंदिराच्या वतीने एक प्रतिनिधी मंडळ गुरुवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. बीएपीएस स्वामीनारायण संस्थेच्या वतीने पूज्य ईश्वरचरण स्वामीजी आणि पूज्य ब्रह्मविहारी स्वामीजी यांनी गुरुवर्य महंत स्वामीजी यांच्या वतीने पंतप्रधान मोदी यांना मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले. पंतप्रधान मोदी यांना आमंत्रण देतानाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.
या भेटीबाबत बीएपीएस स्वामीनारायण संस्थेद्वारा सोशल मीडियावर सांगण्यात आले. त्यामध्ये त्यांनी १४ फेब्रुवारी २०२४ रोजी होणाऱ्या बीएपीएस हिंदू मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा महोत्सव आणि लोकार्पण उत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच, पंतप्रधान मोदी यांनीही हे आमंत्रण स्वीकारल्याचे बीएपीएस स्वामीनारायण संस्थेद्वारा सांगण्यात आले आहे. ही संस्था या मंदिराचे व्यवस्थापन बघते.
अबूधाबी येथील हिंदू मंदिराच्या प्रतिनिधीमंडळाने सुमारे एक तास पंतप्रधान मोदी यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. या दरम्यान वैश्विक सौहार्दासाठी हिंदू मंदिराचे महत्त्व आणि जागतिक व्यासपीठावर भारताच्या आध्यात्मिक नेतृत्वासंबंधी मोदी यांच्या दृष्टिकोनाबाबतही चर्चा झाली.
अबूधाबीमधील हे पहिले हिंदू मंदिर आहे. हे मंदिर अल वाकबा जागेवर २० हजार चौरस मीटर जागेवर वसले आहे. या मंदिराला अत्याधुनिक शैलीत साकारण्यात आले आहे. प्राचीन कला आणि आधुनिक वास्तुकलाशास्त्र यांचा संगम या मंदिराच्या शैलीत बघायला मिळतो. या मंदिराचा पायाभरणी समारंभही सन २०१८मध्ये नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते झाला होता.
हे ही वाचा:
रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दादरच्या दुकानदारांवर बडगा!
फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकला टाकले मागे!
उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे झालेल्या विविध अपघातात १६ जणांचा मृत्यू
राष्ट्रीय खेळांमध्ये डोपिंगमध्ये अडकले २५ खेळाडू
हे मंदिर म्हणजे भारत आणि यूएईमधील संबंध घनिष्ठ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. पंतप्रधान मोदी यांनीही या मंदिराला भारत आणि यूएईमधील घनिष्ठ ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक मानले होते.