अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पण करण्याला मंजुरी दिली. यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला असून पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक राणाचे प्रत्यार्पण करण्याची भारताची बऱ्याच काळापासून मागणी होती. आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवल्यानंतर तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासाठी राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएची टीम लवकरच अमेरिकेला जाणार आहे.
अमेरिकन न्यायालयाच्या निर्णयानंतर भारताने राणाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया वेगवान करण्यास सुरुवात केली आहे. एनआयएच्या चार अधिकाऱ्यांचे पथक राणा याच्या प्रत्यार्पणाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ३० जानेवारीला अमेरिकेला पोहचणार असल्याची माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिली आहे. दरम्यान, दिल्ली कारागृह विभागाने तहव्वूर राणाच्या मुक्कामासाठी तिहार तुरुंगातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहितीही समोर आली आहे. सेलसाठी सुरक्षा मूल्यांकन सुरू केले असून त्याला उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्याची शक्यता आहे. त्याच्या सेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असतील आणि ते त्याच्या सर्व हालचालींवर पूर्णवेळ लक्ष ठेवतील. त्याच्या सेलमध्येचं टॉयलेट आणि बाथरूमची सुविधा असेल, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
A National Investigation Agency (NIA) team is expected to travel to the USA soon to finalize the extradition formalities of Tahawwur Rana, who is sought by India for his involvement in the 26/11 Mumbai terror attacks: Sources pic.twitter.com/RLHsFQOzV8
— ANI (@ANI) January 28, 2025
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला लॉस एंजेलिस तुरुंगात ठेवण्यात आले आहे. एफबीआयने राणाला २००९ मध्ये शिकागो येथे अटक केली होती. तो पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंधित आहे, ज्याला दाऊद गिलानी म्हणूनही ओळखले जाते. राणा हा या हल्ल्यातील एक प्रमुख व्यक्ती आहे असून दहशतवाद्याला पाठिंबा देण्यासाठी त्याला आणि इतरांना पाकिस्तानमध्ये मदत केल्याचा आरोप आहे. लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या गटाने हा हल्ला केला. हेडली या हल्ल्यातील सहभागासाठी अमेरिकेत ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे.
हे ही वाचा:
उत्तराखंडमध्ये इतिहास घडला, समान नागरी कायदा लागू झाला!
पंजाबमध्ये आंबेडकर पुतळा तोडफोड प्रकरण: या अपमानाला केजरीवाल जबाबदार!
दरम्यान, मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार राणा दहशतवाद्यांना हल्ल्याचे ठिकाण आणि भारतात आल्यानंतर राहण्याची ठिकाणे सांगून मदत करत होता. राणानेच ब्लू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. राणा आणि हेडलीवर दहशतवादी कट रचल्याचा आरोप होता. प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध राणाने केलेले अपील अमेरिकन कोर्टाने १५ ऑगस्ट रोजी फेटाळले होते. तसेच दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने या निर्णयात स्पष्ट केले होते.







