देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून संभाषण केल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्याच्या एका आठवड्यानंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करत त्यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या टर्मसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे. तसेच नवी दिल्ली वॉशिंग्टनसोबत परस्पर फायद्याची आणि विश्वासार्ह भागीदारी करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही पंतप्रधानांनी या संभाषणावेळी अधोरेखित केले.
नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की, “माझे प्रिय मित्र राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलून आनंद झाला. त्यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या टर्मसाठी त्यांचे अभिनंदन. आम्ही परस्पर फायदेशीर आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, समृद्धीसाठी, सुरक्षेसाठी एकत्र काम करू.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर दोन्ही प्रमुख नेत्यांमधील ही पहिलीच चर्चा होती.
Delighted to speak with my dear friend President @realDonaldTrump @POTUS. Congratulated him on his historic second term. We are committed to a mutually beneficial and trusted partnership. We will work together for the welfare of our people and towards global peace, prosperity,…
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2025
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांनी इंडो-पॅसिफिक, मध्य- पूर्व आणि युरोपमधील सुरक्षेसह अनेक प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच दोन्ही नेत्यांनी संबंधांमधील विस्तार आणि सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. तसेच अमेरिकेने बनवलेल्या सुरक्षा उपकरणांची खरेदी भारताने वाढवण्यावर आणि न्याय्य द्विपक्षीय व्यापार संबंधाकडे वाटचाल करण्याच्या महत्त्वावर ट्रम्प यांनी भर दिला. तसेच दोन्ही प्रमुख नेत्यांनी संपर्कात राहून लवकरात लवकर परस्पर सोयीस्कर तारखेला भेटण्याचे मान्य केले आहे.
अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि २०२३-२४ मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ११८ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. दरम्यान, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी बोलावलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) शिखर परिषदेसाठी ट्रम्प पॅरिसला गेल्यास नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, ट्रम्प एआय समिटला उपस्थित राहिले नाहीत तर मोदी दोन्ही नेत्यांमधील पहिल्या भेटीसाठी फेब्रुवारीमध्ये वॉशिंग्टन डीसीला जाऊ शकतात, अशीही शक्यता आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हे ही वाचा:
उत्तराखंडमध्ये इतिहास घडला, समान नागरी कायदा लागू झाला!
पंजाबमध्ये आंबेडकर पुतळा तोडफोड प्रकरण: या अपमानाला केजरीवाल जबाबदार!
चेन्नईच्या किनारपट्टीवर १००० ऑलिव्ह रिडले कासव मृतावस्थेत !
ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात त्यांचा शेवटचा विदेश दौरा भारताचा होता. ट्रम्प आणि मोदी यांनी सप्टेंबर २०१९ मध्ये ह्यूस्टन आणि फेब्रुवारी २०२० मध्ये अहमदाबाद येथे दोन वेगवेगळ्या रॅलींमध्ये हजारो लोकांना संबोधित केले होते. तर, नोव्हेंबर २०२४ मध्ये ट्रम्प यांच्या मोठ्या निवडणूक विजयानंतर त्यांच्याशी बोलणाऱ्या तीन जागतिक नेत्यांमध्ये मोदी देखील होते.