भारत- पाकिस्तानमधील संघर्ष थांबवा अन्यथा व्यापार करणार नाही, असा इशारा दिल्यानंतर शस्त्रसंधी करण्यात आल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. मात्र, भारताकडून हा दावा फेटाळून लावण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स तसेच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्यात झालेल्या स्वतंत्र चर्चेत व्यापारावर चर्चा झाली नाही, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी तणाव कमी न केल्यास त्यांच्याशी व्यापार करणार नाही, असा ट्रम्प यांनी दावा केल्यानंतर काही तासांतच ही प्रतिक्रिया आली आहे. माहितीनुसार, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांना लक्ष्य करणाऱ्या ऑपरेशन सिंदूरला सुरुवात झाल्यानंतर, व्हान्स यांनी ९ मे रोजी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली तर रुबियो यांनी दुसऱ्या दिवशी एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी चर्चा केली. मात्र, यापैकी कोणत्याही चर्चेत व्यापाराचा संदर्भ नव्हता, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांतील घटनांचा उल्लेख केला. भारत आणि पाकिस्तानने शत्रुत्व थांबवण्याच्या निर्णयामागे व्यापार हे एक मोठे कारण असल्याचा दावा केला. ट्रम्प म्हणले की, “शनिवारी, माझ्या प्रशासनाने भारत आणि पाकिस्तानमध्ये पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदी करण्यास मदत केली, मला वाटते की ती कायमस्वरूपी युद्धबंदी असेल आणि ज्यामुळे अण्वस्त्रे असलेल्या दोन राष्ट्रांमधील धोकादायक संघर्ष संपेल,” असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, दोन्ही देश आक्रमकपणे भूमिका असताना अमेरिकेने मदत केली, ज्यामध्ये व्यापाराचाही समावेश होता. तसेच ट्रम्प यांनी दावा केला की अमेरिका भारत आणि पाकिस्तानसोबत चांगला व्यापार करेल.
हे ही वाचा :
पाकिस्तानविरोधात भारताची कारवाई स्थगित आहे, समाप्त झालेली नाही!
“भारत- पाक युद्धबंदीमध्ये अमेरिकेची भूमिका ही मध्यस्थाची नव्हे तर रचनात्मक”
सेनादलांचे स्पष्ट संकेत, दु:साहस केलेत तर तांडव होणार…
तुर्कस्तानचा निषेध: पुण्यातील व्यापाऱ्यांचा सफरचंदावर बहिष्कार!
अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे, २०२४ मध्ये त्यांचा द्विपक्षीय व्यापार १२९.२ अब्ज डॉलर्स होता. दुसरीकडे, गेल्या वर्षी अमेरिकेचा पाकिस्तानसोबतचा एकूण व्यापार अंदाजे ७.३ अब्ज डॉलर्स होता. भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्ध थांबवण्याचे श्रेय ट्रम्प यांनी घेतले.







