अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शांतता योजनेमुळे इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेले दोन वर्षांपासूनचे युद्ध संपले. पहिल्या टप्प्यात इस्रायली बंधक आणि पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात आली. इस्रायली बंधक परतल्यामुळे इस्रायलमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच आता एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हमासने परत केलेल्या इस्रायली बंधकांच्या मृतदेहांपैकी एक मृतदेह कोणाशीही जुळत नसल्याचे समोर आले आहे.
इस्रायली सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, रात्री इस्रायलला परत आणलेल्या चार मृतदेहांपैकी एक मृतदेह हा ओलिस नव्हता. त्यांनी सांगितले की, नॅशनल सेंटर ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनच्या तज्ज्ञांनी हा मृतदेह पॅलेस्टिनी व्यक्तीचे असल्याचे निश्चित केले आहे. इस्रायली लष्कराने बुधवारी सांगितले की, पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमासने दिलेल्या मृतदेहांपैकी एक मृतदेह ओलिसाचा नव्हता. मंगळवारी रात्रीच्या वेळी चार मृतदेहांच्या फॉरेन्सिक चाचण्या झाल्यानंतर, लष्कराने सांगितले की वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असा निष्कर्ष काढला की एक मृतदेह कोणत्याही ओलिसांशी जुळत नाही. त्यानंतर इस्रायली लष्कराने इशारा दिला की हमासने मृत ओलिसांना परत करण्यासाठी सर्व आवश्यक प्रयत्न करावेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केलेल्या युद्धबंदी करारात ओलिसांचे मृतदेह परत करण्याबाबत नमूद केलेल्या अटी हमासने पूर्ण कराव्यात अशी मागणी इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, आम्ही यावर तडजोड करणार नाही आणि शेवटचा मृत ओलिस परत येईपर्यंत आमचे प्रयत्न थांबवणार नाहीत.
अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या युद्धबंदी योजनेत सोमवारी संपणाऱ्या अंतिम मुदतीपर्यंत सर्व ओलिसांची (जिवंत आणि मृत दोन्ही) सुटका करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तथापि, करारानुसार, हमासला मृत ओलिसांची माहिती शेअर करणे आणि शक्य तितक्या लवकर त्यांना परत करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते. हमासचे प्रवक्ते हाझेम कासेम यांनी सांगितले की, युद्धबंदी करारात मान्य केल्याप्रमाणे ओलिसांचे मृतदेह परत करण्यासाठी काम करत आहे. मंगळवारी पूर्व गाझा शहर आणि दक्षिणेकडील रफाह शहरावर गोळीबार करून इस्रायलने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, इस्रायली संरक्षण मंत्री काट्झ यांनी बुधवारी सांगितले की, सैन्य करारात निश्चित केलेल्या तैनाती रेषेवर काम करत आहे आणि तैनाती रेषेजवळ येणाऱ्या कोणालाही लक्ष्य केले जाईल असा इशारा दिला. दफनविधीसाठी नेण्यात येणाऱ्या ओलिसांच्या मृतदेहांना आदरांजली वाहण्यासाठी हजारो इस्रायली रस्त्यावर रांगेत उभे होते आणि इस्रायली झेंडे घेऊन शांतपणे उभे होते.







