पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्या पद्धतीने गेले २० दिवस पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारताने चोख उत्तर दिले. शनिवारी या दोन देशांत शस्त्रसंधी झाल्याची खबर दुपारी आली आणि हा संघर्ष थांबणार अशी शक्यता असतानाच पाकिस्तानकडून श्रीनगर, नागरोटा,कच्छ, नालिया (गुजरात), राजौरी, गुरदासपूर, पंजाब, राजस्थानात ड्रोन हल्ले करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. त्यावर रात्री परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पाकिस्तानला इशारा दिला.
पाकिस्तानने त्याआधी दुपारी ३.३० वाजता भारताशी संपर्क साधून शस्त्रसंधीची तयारी दर्शविली होती. पण तीन तासातच हे सगळे हवेत विरले आणि पाकिस्तानकडून विविध शहरात पुन्हा ड्रोन हल्ले सुरू झाले. अर्थात भारताने ते परतवून लावले. पण त्यामुळे शस्त्रसंधीचे नेमके काय झाले, अमेरिकेने यात मध्यस्थी केली तर त्याचे काय झाले असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येत होते. पाकिस्तानात लष्कर आणि सरकार यांच्यात मतभेद आहेत का, त्यामुळे एकीकडे पंतप्रधान शहाबाद शरीफ शस्त्रसंधीसाठी तयार आहेत पण पाकिस्तानी लष्कर मात्र तयार नाही अशी स्थिती आहे का, असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “गेल्या काही तासांपासून भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संचालन महासंचालकांमध्ये आज सायंकाळी झालेल्या चर्चेतील कराराचे वारंवार उल्लंघन होत आहे. भारतीय सशस्त्र दलांकडून याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल.
ते पुढे म्हणाले, “सशस्त्र दलांकडून या उल्लंघनांना योग्य व पुरेसं प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि आम्ही या उल्लंघनांना अतिशय गांभीर्याने घेत आहोत. आम्ही पाकिस्तानला योग्य ती पावले उचलण्याचे आणि परिस्थितीला जबाबदारीने हाताळण्याचे आवाहन करतो.”
हे ही वाचा:
पाकिस्तानचे शेपूट वाकडेच! शस्त्रसंधी तीन तासात मोडली, भारताकडून गंभीर दखल
पाकिस्तानी ड्रोनचा टार्गेट होते निष्पाप नागरिक
मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची घेतली माहिती
परराष्ट्र सचिवांच्या मते, सशस्त्र दलांनी परिस्थितीवर कडक नजर ठेवली आहे. “आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रणरेषेवर कोणत्याही पुन्हा उल्लंघनाला कडक प्रत्युत्तर देण्याच्या स्पष्ट सूचना भारतीय दलांना देण्यात आल्या आहेत.”
याच दिवशी सकाळी परराष्ट्र सचिवांनी जाहीर केलं की भारत व पाकिस्तानने जमिनीवर, आकाशात आणि समुद्रात सर्व प्रकारचे गोळीबार व लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती दर्शवली होती. ही सहमती शनिवारी संध्याकाळी ५ वाजल्यापासून प्रभावी होणार असल्याचं स्पष्ट केलं गेलं. ही चर्चा पाकिस्तानने पुढाकार घेऊन आयोजित केली होती आणि दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालक (DGMO) स्तरावर झाली होती.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही या घडामोडीची पुष्टी केली व या निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले कारण त्यांनी या शांतताप्रयत्नांना चालना दिली, असे त्यांनी म्हटले. तसेच या निर्णयामुळे या भागातील प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या दिशेने नवा अध्याय सुरू होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
मात्र, या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही तासांतच पाकिस्तान लष्कराने या समजुतीचे उल्लंघन करून श्रीनगर, काश्मीरच्या इतर भागांत, जम्मूमध्ये तसेच राजस्थान व पंजाबमधील अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले. हे हल्ले नियंत्रणरेषा व आंतरराष्ट्रीय सीमेवर करण्यात आले.







