पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानची राजनैतिक कोंडी केली जात असतानाचं पाकिस्तानला भीती सतावत आहे की, भारत लष्करी कारवाई करेल. भारताकडून लष्करी कारवाई होईल या भीतीने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. यासाठी अस्वस्थ पाकिस्तानकडून सातत्याने हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. लष्कराच्या संभाव्य हालचाली शोधण्यासाठी नियंत्रण रेषेवर (एलओसी) अनेक पावले उचलली जात असल्याचे बोलले जात आहे.
भारताच्या एअरस्ट्राईकला डिटेक्ट करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने आपल्या रडार सिस्टीमला सियालकोट सेक्टरमध्ये तैनात केले आहे. फिरोजपूरला लागून असलेल्या परिसरात भारताच्या सैन्य हालचालींची माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरला अग्रभागी तैनात केले आहे. अलिकडेच, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त ५८ किमी अंतरावर असलेल्या चोर कॅन्टोन्मेंटमध्ये TPS- ७७ रडार तैनात केले होते. ‘इंडिया टुडे’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान, सलग पाचव्या दिवशी पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही कारणाशिवाय गोळीबार सुरू केला, भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
हे ही वाचा..
पाकिस्तानच्या दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या कबुलीचे आश्चर्य कसले?
“अल्लाहू अकबर”चे नारे देणाऱ्या झिपलाइन ऑपरेटरची होणार एनआयए चौकशी
सलग पाचव्या दिवशी पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; कुपवाडा, बारामुल्लामधील चौक्या लक्ष्य
पाकिस्तानसमोर मोठा प्रश्न : नवाज यांनी पीएम शहबाजना काय सल्ला दिला?
२२ एप्रिल रोजी ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या बैसरन कुरणात पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तान समर्थित लष्कर-ए-तोयबाचा (एलईटी) गट असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या सूत्रधारांना कल्पनेपलीकडील शिक्षा करणार असल्याचा संकल्प केल्यापासून पाकिस्तान अलर्ट मोडवर आला आहे. शिवाय पाकिस्तानी सैन्याने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील अनेक दहशतवादी लाँच पॅड रिकामे करण्यास सुरुवात केली आहे, असेही वृत्त आहे.







