प्रतिकूल हवामानाचा फटका दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या ‘इंडिगो’च्या विमानाला (6E2142) दोन दिवसांपूर्वी बसला होता. या परिस्थितीमध्ये विमानाच्या पुढील नाकाच्या भागाचे (नोझ कोन) मोठे नुकसान झाले आणि त्याला भगदाड पडले. सुदैवाने वैमानिकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप घेऊन हे विमान श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. या घटनेबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या विमानाला अचानक गारपिटीचा सामना करावा लागला. अतिशय खराब वातावरणाचा अंदाज घेऊन इंडिगो एअरलाइन्सच्या पायलटने लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाकिस्तानी हवाई क्षेत्राचा वापर काही काळ करण्याची परवानगी देण्याची विनंती केली, जेणेकरून खराब वातावरणाचा सामना त्यांना करावा लागू नये आणि प्रवासी सुरक्षित राहावेत. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्येही लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलने ही परवानगी नाकारली. त्यामुळे पायलटला मूळ मार्गानेच उड्डाण सुरू ठेवावे लागले. याचा फटका विमानाला बसला मात्र, सुदैवाने प्रवासी सर्व सुखरूप राहिले.
श्रीनगरला जाणाऱ्या या विमानात २२७ प्रवासी होते. हवेतच गारपिटीचा जबरदस्त मारा झाल्याने विमानाच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले. मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळाले. पायलटने तात्काळ आपत्कालीन स्थिती जाहीर केली. शिवाय विमान सायंकाळी ६.३० वाजता श्रीनगर विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य सुखरूप असून या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. सुखरूप विमान उतरवल्यानंतर सर्वांनीचं पायलटचे कौतुक करत आभार मानले. या विमानात तृणमूल काँग्रेसचे डेरिक ओ ब्रायन, नदिमुल हक, सागरिका घोष, मानस भुइय्या आणि ममता ठाकूर हे पाच नेतेही प्रवास करत होते. त्यांनीही पायलटचे आभार मानले.
हे ही वाचा..
पाकसाठी हेरगिरी करणारा तुफैल ६०० पाकिस्तानी नंबरच्या होता संपर्कात
“मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शलऐवजी ‘राजा’ पदवी द्यावी”
बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस राजीनामा देणार?
हावर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेश बंदीचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने का घेतला?
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक मारले गेल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे. भारतीय हवाई हद्देतून पाकिस्तानी विमानांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली आहे. मात्र, आपत्कालीन परीस्थितीमध्ये भारतीय विमानाला परवानगी नाकारल्यानंतर पाकिस्तानवर टीका केली जात आहे.







