दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा जगासमोर आणण्यासाठी आणि भारताची दहशतवादाविरोधातील कारवाई याची माहिती देण्यासाठी भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ विविध देशांचा दौरा करत आहेत. असेच एक शिष्टमंडळ रशियाला रवाना झाले असून यावेळी त्यांचे विमान उतरण्यापूर्वी त्यांना अडचणीचा सामना करावा लागला. शिष्टमंडळ प्रवास करत असलेले विमान रशियाची राजधानी मॉस्कोतील विमानतळावर उतरणार त्याआधीच विमानतळावर ड्रोन हल्ला झाला. त्यामुळे विमानाला बराचवेळ उतरता आले नाही.
द्रमुक खासदार कनिमोझी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंदूर आउटरीच शिष्टमंडळ हे मॉस्कोसाठी रवाना झाले. या शिष्टमंडळाला घेऊन जाणाऱ्या विमानाला मॉस्को येथे उतरण्यापूर्वी बराच वेळ हवेत चकरा माराव्या लागल्याची माहिती आहे. विमान उतरण्याच्या काही वेळपूर्वीच युक्रेनने रशियाच्या विमानतळावर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यामुळे विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले. याचा परिणाम म्हणून डोमोडेडोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे काही तासांसाठी थांबवण्यात आली. त्यामुळे शिष्टमंडळ असलेल्या विमानाचे लँडिंगही काही तास उशिराने झाले.
युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे, विमानाला उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली आणि या व्यत्ययादरम्यान विमानाला हवेतच राहावे लागले. बराच वेळ विलंब झाल्यानंतर, विमान अखेर सुरक्षितपणे उतरले. रशियातील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले आणि त्यांना त्यांच्या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे पोहोचवले.
हे ही वाचा..
पाकला माणुसकीचा विसर; हवाई हद्द वापरण्याची इंडिगोच्या पायलटची विनंती नाकारली
पाकसाठी हेरगिरी करणारा तुफैल ६०० पाकिस्तानी नंबरच्या होता संपर्कात
“मुनीर यांनी स्वतःला फील्ड मार्शलऐवजी ‘राजा’ पदवी द्यावी”
बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस राजीनामा देणार?
२२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तानविरुद्ध सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी कनिमोझी यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ रशिया, स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया आणि लाटविया या देशांमध्ये जाणार आहे. हे पथक दहशतवादविरोधातील भारताची भूमिका मांडणार आहे. शिष्टमंडळातील इतर सदस्यांमध्ये समाजवादी पक्षाचे राजीव राय, नॅशनल कॉन्फरन्सचे मियां अल्ताफ अहमद, भाजपचे ब्रिजेश चौटा, राजदचे प्रेमचंद गुप्ता, आपचे अशोक कुमार मित्तल आणि माजी राजनयिक मंजीव एस पुरी आणि जावेद अश्रफ यांचा समावेश आहे.
