पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर कारवाई करत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूचं राहिल्या. या सर्व पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताने चोख उत्तर दिले. या तणावाच्या काळात पाकिस्तानने वारंवार खोटी माहिती पसरवत अनेक दावे केले. उच्चस्तरीय मंत्र्यांनीही या दाव्यांचा वापर करत जगासमोर वेगळे चित्र उभे करण्याचे काम केले. मात्र, वेळोवेळी त्यांचे हे दावे खोटे असल्याचे समोर आले आणि पाकिस्तान जगासमोर उघडा पडला. अनेकदा लाज निघूनही पाकिस्तानमधील मंत्र्यांचे खोटे दावे करण्याचे आणि चुकीची माहिती पसरवण्याचे सत्र सुरूचं आहे. अशातच आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक चुकीची बातमी शेअर केल्याने ते टीकेचे धनी बनले आहेत.
उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी यूकेस्थित ‘द डेली टेलिग्राफ’च्या बनावट बातमीचा हवाला देऊन देशाच्या हवाई दलाचे कौतुक केले आहे. ब्रिटिश वृत्तपत्र ‘द टेलिग्राफ’मधील एक बातमीचा फोटो पाकिस्तानमध्ये व्हायरल झाला होता. ज्यामध्ये मथळा होता, पाकिस्तानची वायुसेना ही आकाशाची राजा आहे. या मथळ्यासह वर्तमानपत्राचे बनावट पान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले गेले. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनीही याचा उल्लेख केला आणि संसदेत हवाई दलाचे कौतुक केले. आता पाकिस्तानच्या स्वतःच्या वृत्तपत्र ‘डॉन’ने त्याची सत्यता पडताळली आहे, ज्यामध्ये ते पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडावर पडला आहे.
पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’च्या आयव्हेरिफाय पाकिस्तान टीमने या बातमीची तपासणी केली. व्हायरल फोटोमध्ये विसंगती आढळल्या आणि ती माहिती खोटी असल्याचे समोर आले. १० मे पासून सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांच्या पोस्टमध्ये हा फोटो शेअर केला जात आहे, ज्यामध्ये भारतासोबतच्या अलिकडच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर द डेली टेलिग्राफ वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर पाकिस्तानी हवाई दलाला ‘आकाशाचा राजा’ घोषित केले आहे. मात्र, असा कोणताही लेख वर्तमानपत्रात प्रकाशित झाला नव्हता आणि स्क्रीनशॉट बनावट आहे, असे डॉनने वृत्त दिले आहे.
हे ही वाचा :
ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती द्या! शिवसेनेकडून १० लाख मिळवा!
चकमकीपूर्वी दहशतवाद्याला आईचा व्हिडीओ कॉल, म्हणाली “बेटा, शरण जा”
सीमेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितचं!
सोशल मीडियावर व्हायरल झालेला द टेलिग्राफचा कट पूर्णपणे बनावट होता. तो १० मे चा अंक असल्याचा दावा करत शेअर केला जात होता, त्या दिवशी वृत्तपत्राने भारत किंवा पाकिस्तानबद्दल कोणतीही बातमी पहिल्या पानावर प्रकाशित केली नव्हती. याशिवाय, एका प्रतिष्ठित वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर शेअर केलेल्या चित्रात अनेक स्पेलिंग चुका होत्या. इशाक दार यांनीही या बनावट क्लिपिंगचा वापर करून पाकिस्तानी हवाई दलाचे कौतुक केले आणि जेव्हा तथ्य तपासणी झाली तेव्हा ते गप्प राहिले.







