२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे, परंतु सुरक्षा दलांना अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचता आलेले नाही. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांवर २० लाख रुपयांचे बक्षीस ठेवले असले तरी, अद्याप या दहशतवाद्यांबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता याबाबत शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) मोठी घोषणा केली आहे. या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास शिवसेनेकडून अतिरिक्त बक्षीस जाहीर जाहीर करण्यात आले आहे.
शिवसेनेने याबाबत जारी केलेल्या पत्रात म्हटले, ‘दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आज (१५ मे ) पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या संशयितांची ओळख पटवण्यासाठी माहिती देणाऱ्यांना १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले.’
पत्रात पुढे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी तीन संशयितांचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर, ज्यासाठी त्यांनी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, त्याला प्रतिसाद म्हणून ही घोषणा करण्यात आली आहे. “आम्ही दहशतवाद आणि त्याचे समर्थन करणाऱ्यांविरुद्ध ठामपणे उभे आहोत. या गुन्हेगारांना न्याय मिळवून देण्यास मदत करणारी कोणतीही माहिती घेऊन पुढे येण्याचे आम्ही नागरिकांना आवाहन करतो. “बक्षीस रकमेत भर घालून, दोषींना जबाबदार धरले जाईल आणि पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल याची खात्री करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
हे ही वाचा :
चकमकीपूर्वी दहशतवाद्याला आईचा व्हिडीओ कॉल, म्हणाली “बेटा, शरण जा”
‘स्पॉटीफाय’वरून पाकिस्तानी गाणी काढली!
सीमेपलीकडील दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितचं!
‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’चा भाग बनलेल्या आशुतोष राणा यांचा अनुभव काय ?
पत्रात पुढे आवाहन करताना शिवसेनेने म्हटले, संशयितांना पकडण्यासाठी जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे हे शिवसेनेच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. आम्ही जनतेला आवाहन करतो की त्यांनी या संधीचा वापर करून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत योगदान द्यावे आणि आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करावी.
