भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गुरुवार, १५ मे रोजी सिंधू पाणी वाटप करारावर भाष्य केले. तसेच त्यांनी पाकिस्तानला इशाराही दिला आहे. पाकिस्तान जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगित राहील, असा कठोर इशारा जयशंकर यांनी पाकिस्तानला दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली असली तरी सिंधू पाणी वाटप करारावर मात्र भारताने कोणताही निर्णय घेतला नसून तो स्थगितचं ठेवण्यात आला आहे. यानंतर पाकिस्तानमधील शेतकरी सिंधू पाणी वाटप करारावर अवलंबून असणाऱ्या पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.
केंद्रीय मंत्री एस जयशंकर म्हणाले की, “सिंधू जल करार हा स्थगित आहे. जोपर्यंत पाकिस्तानकडून सीमेपलीकडून होणारा दहशतवाद विश्वासार्हपणे थांबत नाही तोपर्यंत हा करार स्थगितचं राहील. काश्मीरवर चर्चा करायची असलेली एकमेव गोष्ट म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग रिकामा करणे; आम्ही त्या चर्चेसाठी खुले आहोत,” असा कठोर इशारा जयशंकर यांनी दिला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘सिंधू जल करार’ संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तान प्रचंड बिथरला असून त्याने भारतासमोर गुडघे टेकले आहेत. पाकिस्तानने भारताला या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानने भविष्यातील संभाव्य संकट लक्षात घेऊन भारताकडे मदतीची याचना केली आहे. पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाने भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला यासंबंधी एक पत्रही पाठवले आहे. त्यांनी म्हटले आहे की या निर्णयामुळे पाकिस्तानमध्ये गंभीर संकट उद्भवेल.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाईचे निर्देश देत पाकिस्तानविरुद्ध धाडसी राजनैतिक आक्रमक भूमिका घेत, १९६० चा सिंधू पाणी करार (आयडब्ल्यूटी) तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने १९६० मध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या करारानुसार, भारताला पूर्वेकडील नद्या- रावी, बियास आणि सतलजवर विशेष नियंत्रण देण्यात आले होते, तर पाकिस्तानला पश्चिमेकडील नद्या- सिंधू, झेलम आणि चिनाबवर अधिकार देण्यात आले होते, जरी त्यांचे उगमस्थान जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय हद्दीत असले तरी.
हे ही वाचा..
ट्रम्प यांनी ऍपलला भारतात उत्पादन करू नका असे का सांगितले?
बॉर्डर २’ च्या निर्मात्या निधी दत्ता यांनी खुलेपणाने काय बोलल्या ?
राष्ट्रपती मुर्मु यांनी न्यायालयाला का विचारले १४ प्रश्न?
पाकिस्तान हा शेतीसाठी सिंधू नदी प्रणालीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अर्थव्यवस्थेतही मोठा वाटा आहे. पाकिस्तानच्या सिंचन क्षेत्रापैकी जवळपास ९० टक्के क्षेत्र हे सिंधू खोऱ्यातील पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या नद्यांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात कोणताही व्यत्यय आल्यास पाण्याची टंचाई वाढवू शकते, पीक उत्पादन कमी होऊ शकते आणि विशेषतः आधीच पाण्याच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या पंजाब आणि सिंध प्रांतांमध्ये, देशांतर्गत अशांततेला चालना मिळू शकते.
