भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये एकीकडे टॅरिफबाबत चर्चा सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऍपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात ऍपल उत्पादने तयार करण्यास मनाई केल्याची माहिती समोर आली आहे. भारत स्वतःचे बघून घेईल अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
दोहा येथील एका कार्यक्रमात, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, त्यांनी ऍपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात उत्पादन न करण्याचा सल्ला दिला आहे. या सल्ल्यानंतर ऍपल अमेरिकेत आयफोनचे उत्पादन वाढवेल, अशी अपेक्षा त्यांनी ठेवली आहे. ट्रम्प यांनी या सल्ल्यामागचे कारणही दिले आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे, परंतु तिथे उत्पादने विकणे अमेरिकेसाठी सर्वात कठीण आहे. भारताने अमेरिकन उत्पादनांवरील शुल्क कमी करण्याबाबत बोलणे सुरू केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा ऍपल चीनबाहेर भारतात उत्पादन युनिट्स उभारण्यासाठी रस दाखवत आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, ऍपलचे आयफोन आणि मॅकबुक जगभरात लोकप्रिय असून ते अमेरिकेत आपले उत्पादन वाढवण्यास सज्ज आहे. ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ निर्णयाला तोंड देण्यासाठी आयफोन निर्माता कंपनी भारतात उत्पादन वाढवण्याची आणि चीनमधून उत्पादन हलवण्याची योजना आखत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतात उत्पादन करण्याविरुद्ध ऍपलला इशारा दिला आहे. ऍपलचे सध्या भारतात तीन प्लांट आहेत, दोन तामिळनाडूमध्ये आणि एक कर्नाटकमध्ये. यापैकी एक फॉक्सकॉनद्वारे चालवला जातो आणि उर्वरित दोन टाटा ग्रुपद्वारे चालवले जातात. ऍपलचे आणखी दोन प्लांट पाइपलाइनमध्ये आहेत.
हे ही वाचा..
बॉर्डर २’ च्या निर्मात्या निधी दत्ता यांनी खुलेपणाने काय बोलल्या ?
राष्ट्रपती मुर्मु यांनी न्यायालयाला का विचारले १४ प्रश्न?
“कर्नल सोफिया कुरैशी यांना सलाम!”
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी असाही दावा केला की, नवी दिल्लीने वॉशिंग्टन डीसीला एक करार करण्याची ऑफर दिली आहे आणि ते अमेरिकन वस्तूंवर कोणतेही शुल्क आकारणार नाही असे म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत सरकारने आम्हाला एक करार दिला आहे ज्या अंतर्गत ते कोणतेही शुल्क आकारण्यास तयार नाहीत. वॉशिंग्टन आणि नवी दिल्ली यांच्यात सुरू असलेल्या व्यापार चर्चेत प्रगती झाल्याचे त्यांनी संकेत दिले. मात्र, भारताने अद्याप अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
