पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी काही दिवसांपूर्वी दहशतवादी गटांना पाठिंबा आणि निधी देण्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याची जाहीर कबुली दिली होती. यानंतर आता पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनीही पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध मान्य केले आहे. पाकिस्तानला एक भूतकाळ आहे, असे अधोरेखित करत त्यांनी दहशतवादी कारवायांशी असलेल्या देशाच्या संबंधांची कबुली दिली आहे केले आहे.
गुरुवारी स्काय न्यूजच्या यालदा हकीम यांच्याशी झालेल्या संभाषणात बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी इतिहासाची कबुली दिली. त्यांनी दावा केला की, “संरक्षणमंत्र्यांनी जे सांगितले ते मला वाटत नाही की पाकिस्तानचा भूतकाळ आहे हे गुपित राहिलेले नाही. परिणामी, आपण दुःख सहन केले आहे, पाकिस्तानलाही दुःख सहन करावे लागले आहे. आपण दहशतवादाच्या एकामागून एक अशा लाटा अनुभवल्या आहेत. परंतु, आपण जे भोगले त्यातून आपण धडेही शिकलो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण अंतर्गत सुधारणा केल्या आहेत,” असे भुट्टो म्हणाले. पुढे ते म्हणाले की, पाकिस्तानच्या इतिहासाचा विचार केला तर तो इतिहास आहे आणि आज आपण त्यात सहभागी नाही आहोत. हे खरे आहे की तो आपल्या इतिहासाचा एक दुर्दैवी भाग आहे.
गुरुवारी मीरपूर खास येथे एका रॅलीला संबोधित करणाऱ्या भुट्टो यांनी पुन्हा एकदा पोकळ भाषणबाजी केली आणि असा दावा केला की पाकिस्तानला शांतता हवी आहे परंतु जर भारताने त्यांना चिथावणी दिली तर ते युद्धासाठी तयार आहेत. “पाकिस्तान हा शांतताप्रिय देश असून इस्लाम हा शांतताप्रिय धर्म आहे. आम्हाला युद्ध नको आहे, पण जर कोणी आमच्यावर हल्ला केला तर त्यांनी युद्धासाठी तयार असले पाहिजे. आम्ही युद्धाचे ढोल वाजवत नाही, पण जर चिथावणी दिली तर एकजूट पाकिस्तानची गर्जना बधिर करणारी असेल,” असे भुट्टो रॅलीत म्हणाले.
काही दिवसांपूर्वीचं संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटले होते की, “आम्ही सुमारे तीन दशकांपासून अमेरिकेसाठी आणि ब्रिटनसह पश्चिमेकडील देशांसाठी हे घाणेरडे काम करत आहोत. ती एक चूक होती, आणि आम्हाला त्याचे दुःख सहन करावे लागले. जर आम्ही सोव्हिएत युनियनविरुद्धच्या युद्धात आणि नंतर ९/११ नंतरच्या युद्धात सामील झालो नसतो, तर पाकिस्तानचा इतिहास निर्दोष राहिला असता,” असे ख्वाजा आसिफ म्हणाले.
हे ही वाचा :
संपूर्ण काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन, ३ हजारांहून अधिक लोक ताब्यात!
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणांवर १० लाखांहून अधिक सायबर हल्ले
पंकजा मुंडेंना अश्लील संदेश पाठवणाऱ्या एकाला पुण्यातून अटक
राजधानीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत
तत्पूर्वी, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला प्रतिसाद देताना बिलावल भुट्टो यांनी म्हटले होते की, “सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर आमचे पाणी त्यातून वाहेल किंवा त्यांचे रक्त.”







