भारत आणि पाकिस्तान यांच्यात अमेरिका यांच्या मध्यस्थीनंतर युद्धविरामामुळे सध्या तरी दोन्ही अण्वस्त्रसज्ज शेजाऱ्यांमधील संघर्ष टळला आहे. मात्र युद्धविरामाच्या बातम्या आल्याबरोबर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेच्या (LoC) पलीकडे उल्लंघन झाल्याच्याही घटना समोर आल्या. मात्र त्याआधी पाकिस्तानने जी आगळीक केली त्याचे चोख प्रत्युत्तर भारताने दिले. त्यामुळे पाकिस्तानला जबर नुकसान सहन करावे लागले.
भारताने २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ७ मे रोजी सकाळी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या ऑपरेशनमध्ये १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
पाकिस्तानची हवाई सुरक्षा आणि एअरबेसना मोठा फटका
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “आम्ही त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधांना नष्ट केले, त्यांच्या हवाई सुरक्षेला हानी पोहचवली आणि अनेक एअरबेसवर हल्ला केला. गेल्या चार दिवसांत भारतीय सेनेने चांगले प्रदर्शन केले आणि पाकिस्तानचे प्रत्युत्तर बहुसंख्य ठिकाणी निष्फळ ठरवले.”
हे ही वाचा:
“भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून मशिदींचे नुकसान केल्याचा पाकचा दावा खोटा!”
बातम्या देताना हवाई हल्ला सायरनच्या आवाजाचा वापर करू नका!
पाकिस्तानी ड्रोनचा टार्गेट होते निष्पाप नागरिक
भारताने ९ दहशतवादी प्रशिक्षण तळ केले उद्ध्वस्त
भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांवर सर्जिकल स्ट्राईक केले. केवळ २६ मिनिटांत जवळपास १०० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये राफेल विमानांतून स्काल्प क्रूझ क्षेपणास्त्र, हॅमर स्मार्ट शस्त्रे, गाइडेड बॉम्ब, M777 हॉवित्झर गोळेबारूद व ‘कामिकाझे’ ड्रोनचा वापर झाला.
पाकिस्तानची ड्रोन हल्ल्यांची फसलेली योजना
८–९ मेच्या रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तरेकडील लेह, जम्मू, बठिंडा पासून पश्चिमेकडील सर क्रीकपर्यंत ३६ ठिकाणी ३००–४०० तुर्कस्तानी ‘सोंगर’ सशस्त्र ड्रोन पाठवले. भारतीय सेनेने यापैकी बहुतांश ड्रोन पाडले. प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानच्या लाहोर, कराचीसह इतर हवाई सुरक्षेवर हल्ले करून ती नष्ट केली.
भारतीय लष्कराने विविध हवाई संरक्षण प्रणाली तैनात
गेल्या चार दिवसांत भारतीय लष्कराने S-400 ट्रायम्फ, आकाश, बराक-८, विविध ड्रोनविरोधी प्रणाली व इतर संरक्षण साधनांचा वापर करून हवाई हल्ले निष्प्रभ केले.
१० मे रोजी पाकिस्तानला सर्वात मोठा झटका
१० मे रोजी सकाळी भारतीय वायुदलाने पाकिस्तानमधील रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर, चुनियन, पसरूर आणि सियालकोटमधील ८ लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. यामध्ये विमानतळ, रडार यंत्रणा व शस्त्रसाठा केंद्रांचा समावेश होता.
विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी सांगितले की, “स्कार्दू, सरगोधा, जैकबाबाद व भोलारीसारख्या पाकिस्तानच्या मुख्य एअरबेसना मोठे नुकसान झाले आहे. तसेच हवाई संरक्षण प्रणाली व रडारच्या नुकसानीमुळे पाकिस्तानी हवाई सुरक्षेचे संतुलन बिघडले आहे. नियंत्रण रेषेपलीकडील सैन्य व लॉजिस्टिक केंद्रांनाही मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचली असून त्यांच्या संरक्षणात्मक व आक्रमक क्षमतांचा पूर्णतः खात्मा झाला आहे.”







