पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या आसियान शिखर परिषदेला क्वालालंपूरला प्रत्यक्ष उपस्थित राहणार नाहीत, तर ते व्हर्च्युअल माध्यमातून सहभागी होणार आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी होऊ शकणाऱ्या संभाव्य भेटीबाबत सुरू असलेल्या अटकळींनाही पूर्णविराम मिळाला आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या शिखर परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची शक्यता आहे, असे पीटीआयने वृत्त दिले आहे. गेल्या महिन्यात, ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल पोस्टमध्ये म्हटले होते की, भारत आणि अमेरिका तणावानंतर संबंध पुन्हा स्थापित करण्याचा विचार करत असल्याने, “येत्या आठवड्यात” मोदींना भेटण्यास ते उत्सुक आहेत. या वक्तव्यामुळे दोन्ही नेते आसियान शिखर परिषदेत प्रत्यक्ष भेटू शकतात, अशी अटकळ बांधली जात होती.
दरम्यान, या शिखर परिषदेला व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार असल्याचे पंतप्रधानांनी स्वतः एक्स पोस्टकरत सांगितले. “माझे प्रिय मित्र, मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी उबदार चर्चा झाली. मलेशियाच्या आसियान अध्यक्षपदाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि आगामी शिखर परिषदेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या. आसियान-भारत शिखर परिषदेत व्हर्च्युअल पद्धतीने सामील होण्यास आणि आसियान-भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्यास उत्सुक आहे,” असे पंतप्रधान मोदींनी एक्सवर सांगितले.
बुधवारी, पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी एका निवेदनात मलेशिया आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर भर दिला. “काल रात्री, मला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका सहकाऱ्याचा फोन आला, ज्यामध्ये त्यांनी मलेशिया-भारत द्विपक्षीय संबंध अधिक धोरणात्मक आणि व्यापक पातळीवर मजबूत करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. तंत्रज्ञान, शिक्षण आणि प्रादेशिक सुरक्षा या क्षेत्रातील घनिष्ठ सहकार्याव्यतिरिक्त, व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रात भारत मलेशियासाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे,” असे अन्वर म्हणाले.
हे ही वाचा :
दिवाळीला फटाके फोडल्यामुळे हिंदू महिलेला मुस्लीम महिलांकडून मारहाण; केस ओढले, पायाला फ्रॅक्चर!
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा?
भारत रशियन तेलाची आयात कमी करेल, ट्रम्प यांचा पुन्हा दावा
युद्ध निधीला आळा घालण्यासाठी रशियाच्या दोन तेल कंपन्यांवर अमेरिकेकडून निर्बंध
त्यांनी क्वालालंपूर येथे होणाऱ्या ४७ व्या आसियान शिखर परिषदेचाही उल्लेख केला आणि भारतातील दीपावली उत्सवामुळे पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहणार असल्याचे नमूद केले. “मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो आणि त्यांना आणि संपूर्ण भारतातील लोकांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो,” असे अन्वर पुढे म्हणाले.







