रशियाने शनिवारी युक्रेनची राजधानी कीव्हवर हल्ला केला. पहिल्या स्फोटानंतर काही मिनिटांतच हवाई धोक्याचा सायरन वाजला. फेब्रुवारी २०२२ मध्ये युद्ध सुरू केल्यापासून मॉस्को जवळपास दररोज कीव्हवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागत आहे. परंतु, अलीकडेच डझनभर अति-वेगवान बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करून केलेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या मालिकेमुळे युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या आठवड्यात झालेल्या अशाच एका हल्ल्यात, शहरात हवाई धोक्याचा सायरन वाजण्यापूर्वीच कीव्हच्या आकाशात झालेल्या क्षेपणास्त्राच्या स्फोटाने झोपलेल्या नागरिकांना हादरवून सोडले. कीव्हच्या लष्करी प्रशासनाचे प्रमुख तिमुर तकाचेंको यांनी टेलिग्रामवर दुजोरा दिला की, रशिया “राजधानीवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करत आहे”. त्यांनी नागरिकांना “सुरक्षित ठिकाणी राहण्याचे” आवाहन केले.
झेलेंस्की यांचे संबोधन
रशियाच्या लष्करी आणि आर्थिक लक्ष्यांवर हल्ले तीव्र करण्यासाठी युक्रेन आपल्या सशस्त्र दलांमध्ये ‘लांब पल्ल्याचा प्रभाव’ पाडणाऱ्या एका नवीन कमांडची स्थापना करत आहे, अशी घोषणा राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी शुक्रवारी रात्रीच्या भाषणात केली.
युक्रेन रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधा आणि लॉजिस्टिक केंद्रांवर लांब पल्ल्याच्या ड्रोन हल्ल्यांची मोहीम राबवत असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे. कीव्हच्या मते, या रणनीतीचा उद्देश मॉस्कोची युद्ध सुरू ठेवण्याची आणि त्यासाठी निधी उभारण्याची क्षमता कमकुवत करणे हा आहे. या हल्ल्यांमुळे रशियाने डिझेल निर्यातीवर घातलेली बंदी आणि अझोव्ह समुद्राजवळील जहाज वाहतुकीवर घातलेले निर्बंध यांत भर पडल्याचे वृत्त आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून युक्रेनचे ड्रोन रशियाच्या भूभागातील महत्त्वाच्या ऊर्जा सुविधांना लक्ष्य करत आहेत. क्रेमलिनच्या महसुलाच्या मुख्य स्रोतांविरुद्धची ही ‘लांब पल्ल्याची निर्बंधात्मक कारवाई’ असल्याचे कीव्हचे म्हणणे आहे. “आज मी सशस्त्र दलांमध्ये एका विशेष कमांडच्या स्थापनेसाठी आदेशावर स्वाक्षरी केली आहे – ही कमांड या युद्धाला प्रत्युत्तर म्हणून रशियावर लांब पल्ल्याचा आणि परिणामी जागतिक प्रभाव पाडण्याच्या उद्देशाने काम करेल,” असे झेलेंस्की म्हणाले. “या कमांडने रशियाची युद्ध करण्याची क्षमता आणखी कमी करण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा १००% वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले.
युक्रेनचा तेल शुद्धीकरण प्रकल्पावर हल्ला
शुक्रवारी रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्यांच्या मालिकेची जबाबदारी युक्रेनने स्वीकारली, त्याच वेळी झेलेंस्की यांची ही घोषणा आली. युक्रेनच्या जनरल स्टाफच्या माहितीनुसार, युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या क्रास्नोदार प्रदेशातील ‘इल्स्की’ तेल शुद्धीकरण प्रकल्प (जो देशाच्या दक्षिणेकडील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे) तसेच लेनिनग्राड प्रदेशातील ‘उस्त-लुगा’ तेल शुद्धीकरण संकुलाला लक्ष्य केले. लष्कराने असेही सांगितले की, रोस्तोव्ह भागातील एका ऑईल टर्मिनलवर आणि एका ऑईल डेपोवरही हल्ले करण्यात आले.
हे ही वाचा:
“जम्मू-काश्मीर भारताचाच”; ढाक्यात चुकीच्या नकाशावर भारताचा आक्षेप
आईच्या हत्येप्रकरणी नवे वळण; वडिलांच्या मृत्यूबाबतही मुलीवर आरोप
‘रोडमॅप २०३०’ला मंजुरी; भारत-न्यूझीलंड व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य
युक्रेनचे म्हणणे आहे की, त्यांच्या या मोहिमेमुळे रशियाच्या ‘शॅडो फ्लीट’ला (म्हणजेच निर्बंधांना बगल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेल टँकर्सच्या ताफ्याला) मोठा फटका बसला आहे. युक्रेनच्या ड्रोन दलाचे कमांडर आणि देशाच्या लांब पल्ल्याच्या हल्ल्यांच्या मोहिमेचे एक सूत्रधार असलेल्या रॉबर्ट ब्रोव्हडी यांनी सांगितले की, युक्रेनियन दलांनी अझोव्ह समुद्रात १० टँकर्सवर हल्ले केले. त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या पाच दिवसांत इंधन वाहून नेणाऱ्या जवळपास ५० जहाजांचे नुकसान झाले आहे.







