भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान तालिबानशासित अफगानिस्तान या मुस्लीम देशाकडून भारताला पाठींबा मिळाला होता. या दरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी तालिबानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याशी पहिल्यांदाच संवाद साधला. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल जयशंकर यांनी मुत्ताकी यांचे आभार मानले. गुरुवारी झालेल्या दूरध्वनी संभाषणात, जयशंकर यांनी अफगाणिस्तानातील लोकांसोबतच्या भारताच्या पारंपारिक मैत्रीला अधोरेखित केले आणि त्यांच्या विकासाच्या गरजांसाठी भारताच्या सतत पाठिंब्याचा पुनरुच्चार केला. ऑगस्ट २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांमधील हा पहिला उच्चस्तरीय राजकीय संवाद आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केलेल्या प्रत्युत्तर कारवाईनंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव शिगेला पोहोचला असताना ही चर्चा झाली. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष होते. अफगाण सरकारने पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध केला, याचे जयशंकर यांनी मनापासून कौतुक केले.
जयशंकर यांनी चर्चेनंतर ट्विटरवर लिहिले की, “अफगाणिस्तानचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांच्याशी चांगली चर्चा झाली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा त्यांनी स्पष्ट निषेध केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अफगाण आणि भारतीय लोकांमधील पारंपारिक मैत्रीपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकला आणि त्यांच्या विकासाच्या गरजांना भारताचा सतत पाठिंबा राहील याची पुष्टी केली. खोट्या आणि निराधार अहवालांद्वारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नांना त्यांनी ठामपणे नकार दिल्याचे स्वागत आहे,” असे जयशंकर म्हणाले.
पहलगाम हल्ल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयातील अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान विभागाचे महासंचालक, भारताचे विशेष दूत आनंद प्रकाश यांनी तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांची भेट घेण्यासाठी काबूलला प्रवास केला होता. त्यांच्या चर्चेत द्विपक्षीय राजकीय संबंध मजबूत करणे, व्यापार आणि वाहतूक सहकार्य वाढवणे आणि अलीकडील प्रादेशिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण करणे यावर भर देण्यात आला.
हे ही वाचा:
तुर्कीला भारताचा पहिला झटका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द !
ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला
चकमकीपूर्वी दहशतवाद्याला आईचा व्हिडीओ कॉल, म्हणाली “बेटा, शरण जा”
जहाजांसाठी डीआरडीओचे नवे तंत्रज्ञान जाणून घ्या!
ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने काबूलमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर एस जयशंकर यांच्यातील हा दोन्ही बाजूंमधील पहिला संपर्क आहे. या वर्षी जानेवारीमध्ये परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दुबईमध्ये मुत्ताकी यांची भेट घेतली. यापूर्वी शेवटचा राजकीय पातळीवरील संपर्क १९९९- २००० मध्ये झाला होता, जेव्हा तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग डिसेंबर १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमान IC-814 च्या कंधारला जाणाऱ्या अपहरणानंतर तालिबानचे परराष्ट्र मंत्री वकील अहमद मुत्तावकिल यांच्याशी संपर्कात होते.







