भारत-पाक युद्धा दरम्यान पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीविरुद्ध भारताने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस ) भारतीय विमानतळांवर सेवा देणाऱ्या तुर्की कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द केली आहे. भारताने केलेल्या या कारवाईमुळे तुर्कीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे की, २१ नोव्हेंबर २०२२ रोजी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला ग्राउंड हँडलिंगसाठी दिलेली सुरक्षा मंजुरी आता रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.
तुर्कीची ही ‘सेलेबी एव्हिएशन’ कंपनी भारतातील नऊ विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवत होती. यामध्ये मुंबई, दिल्ली, कोचीन, कन्नूर, बंगळुरू, हैदराबाद, गोवा, अहमदाबाद आणि चेन्नई येथील विमानतळांचा समावेश आहे.
ग्राउंड हँडलिंग म्हणजे काय?
ग्राउंड हँडलिंगमध्ये प्रवाशांच्या बॅगा हाताळणे, विमानाची स्वच्छता, बोर्डिंग प्रक्रिया आणि इतर आवश्यक ग्राउंड-संबंधित कामे समाविष्ट आहेत. आता सेलेबी भारतातील विमानतळांवरील सुरक्षा क्षेत्रात कोणतेही काम करू शकणार नाही.
हे ही वाचा :
‘डोनाल्ड ट्रम्प’ यांचा घुमजाव, म्हणाले भारत-पाक तणाव कमी करण्यास मदत केली!
ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती द्या! शिवसेनेकडून १० लाख मिळवा!
‘स्पॉटीफाय’वरून पाकिस्तानी गाणी काढली!
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या लष्करी संघर्षादरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. एवढेच नाही तर तुर्कीने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताच्या लष्करी कारवाईचा निषेधही केला. तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या पाठींब्यामुळे भारतात संताप व्यक्त केला जात आहे. भारताने तुर्कीच्या सफरचंदासह इतर गोष्टींवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तुर्कीच्या वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
