भारताने पाकिस्तानला ब्रह्मोसचा दणका दिला. चार दिवसांत पाकिस्तानचा बाजार उठवला. त्यांच्या हवाईतळांवर चंद्र विवरांची निर्मिती केली. ब्रह्मोसच्या धसक्याने अजूनही तिथल्या सेनाधिकाऱ्यांच्या छातीतील धडधड थांबलेली नाही. हा परिणाम आणखी काही काळ जाणवेल. परंतु एक ब्रह्मास्त्र असे आहे, ज्यामुळे पाकिस्तान सतत भारताच्या टाचेखाली राहणार आहे. पाकिस्तानची लाहीलाही होईल असे वळ या अस्त्राने उठणार आहेत. विनाशाच्या दिशेने रोज
एक नवे पाऊल पडणार आहे. या ब्रह्मास्त्रामुळे पाकिस्तान पुन्हा एकदाकळवळला आहे.
भारताकडून मार खाल्ल्यामुळे जग पाकिस्तानकडे पाहून हसते आहे. पाकिस्तानचे राज्यकर्ते मात्र आपणच जिंकलो आहोत, हे जनतेला पटवून देण्यात मश्गूल आहेत. पेंट्गॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी तर पाकिस्तानला भेदरलेल्या कुत्र्याची उपमा दिली आहे. भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानची अवस्था भेदरलेल्या कुत्र्यासारखी झाली असून पायात शेपूट घालून पाकिस्तानची पळापळ सुरू आहे, अशी शेलकी भाषा त्यांनी वापरली आहे. जग काही म्हणत असले तरी पाकिस्तानचा विजयी जल्लोष सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या रोज एक नवी नौटंकी करतायत.
भारत जे काही करेल त्याची नक्कल करण्याचे सध्या या देशाने मनावर घेतले आहे. आपल्या तीन सेनाधिकाऱ्यांनी पत्रकार परीषद घेतली, यांचेही सेनाधिकारी पत्रकार परीषदा घेऊ लागले. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर हवाई तळावर
जवानांच्या भेटीसाठी गेले. त्यामुळे शाहबाज शरीफ यांनाही सुरसुरी आहे. मोदी आदमपूरमध्ये गेले होते, शरीफ सियालकोटमध्ये जाऊन रणगाड्यावर उभे राहून भाषण ठोकून आले. ‘भारताने पाणी पुरवठा थांबवला तर चोख उत्तर देऊ’ असा इशाराही शरीफ यांनी दिला आहे.
त्यांच्यासोबत जनरल मौलाना आसिफ मुनीर आणि पाकिस्तानी लष्कराचे आणखी काही अधिकारी उपस्थित होते. एका बाजूला भारताला पाण्याच्या मुद्द्यावरून धमक्या देणाऱ्या पाकिस्तानने सिंधु जल वाटप कराराला स्थगिती देण्याच्या निर्णयाचा भारताने फेर विचार करावा, अशी विनंती करणारे पत्र पाठवले आहे. अशा कोलांट्या मारणे पाकिस्तानी नेत्यांना भाग आहे. सिंधूच्या पाण्यावर पाकिस्तानची ८० टक्के शेती अवलंबून आहे. हे पाणी तोडल्यास ही शेती साफ सुकून जाईल याची कल्पना असल्यामुळे पाकिस्तान भारताच्या मिनतवाऱ्या करतोय. पहेलगामच्या हल्ल्यानंतर भारताने जेव्हा सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिली तेव्हा पाकिस्तानला मोठा हादरा बसला होता. आपण पाकिस्तानला किती मोठा धक्का देतोय याची जाणीव भारतीयांनाही नव्हती. सिंधू जल वाटप कराराला स्थगिती म्हणजे एखाद्या बकऱ्याला हलाल करतात तसा प्रकार आहे.
मानेची शिर कापल्यामुळे रक्ताचा एकेक थेंब बकऱ्याच्या शरीरीतून वाहून जातो आणि हळुहळू बकरा गतप्राण होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील याची कल्पना फक्त तज्ज्ञांना होती. ख्यातनाम संरक्षण विश्लेषक नीतीन गोखले यांना दिलेल्या एका मुलाखतीत पाकिस्तानमधील माजी भारतीय उच्चायुक्त सतीश चंद्रा यांनी, ‘ही खेळी म्हणजे भारताचा मास्टर स्ट्रोक’ असल्याची भावना व्यक्त केली होती. सिंधूच्या पाण्यावर पाकिस्तान इतका अवलंबून आहे की, हा निर्णय म्हणजे भारताचे ‘ब्रह्मास्त्र’ ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा करार आतबट्याचा होता. भारताचे नुकसान करणारा होता. हा करार ज्यांच्या काळात झाला त्या जवाहरलाल नेहरुंनाही हे ठाऊक होते. या करारामुळे पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचे ८० टक्के पाणी पाकिस्तानच्या वाट्याला गेले.
आधीच पाकिस्तानमधील पाकिस्तान सुजलाम सुफलाम होता. तिथे १४० कालवे होते तर भारतात फक्त १२, तिथे २१ दशलक्ष एकर जमीन सिंचनाखाली होती, तर भारतात फक्त ५ दशलक्ष. तरबेला, मंगला सारखी धरणे होती. कालव्यांची लांबी सुमारे ५०० मैल इतकी होती. तरीही नेहरुंनी हा करार करून भारताचा पाय कुऱ्हाडीवर आदळेल याची व्यवस्था केली. या तीन नद्यांचे करारानुसार जे काही पाणी भारताच्या वाट्याला आले, त्याच्या वापरावरही पाकिस्तानने अडथळे आणण्याचा प्रय़त्न केला. सतत वाटाघाटी, लवाद आणि तटस्थ मध्यस्थांचा वापर करून भारताच्या पाणी अडवण्याच्या
योजनांमध्ये कोलदांडा घालण्याचा प्रय़त्न केला. या कराराचे वाटाघाटीसाठी भारताच्या बाजूने असलेले मुख्य अधिकारी निरंजन दास गुलाठी होते. नेहरुंच्या अखेरच्या काळात ते नेहरुंना भेटायला गेले होते.
हे ही वाचा:
तुर्कीला भारताचा पहिला झटका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या कंपनीची सुरक्षा मंजुरी रद्द !
ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला
चकमकीपूर्वी दहशतवाद्याला आईचा व्हिडीओ कॉल, म्हणाली “बेटा, शरण जा”
जहाजांसाठी डीआरडीओचे नवे तंत्रज्ञान जाणून घ्या!
तेव्हा नेहरु त्यांना म्हणाले की, ‘या कराराचा मुख्य उद्देश फळलाच नाही.’ हा करार आतबट्याचा होता हे नेहरुंना माहिती होते. परंतु पाकिस्तानशी संबंध सुधारतील या गैरसमजापोटी हा करार नेहरुंनी भारताच्या माथी मारला होता. जे लोक देशाचा मोठा भूभाग देऊन समाधानी झाले नाहीत, ते पाणी देऊन समाधानी होतील, हा नेहरुंचा समज अखेरच्या काळात हवेत विरला. या करारांतर्गत पाकिस्तानच्या विविध सिंचन योजनांसाठी त्या काळी भारताने १७५ दशलक्ष डॉलर पाकिस्तानला दिले होते. सतीश चंद्रा यांनी या कराराचे वर्णन अति उदार आणि भारतासाठी अत्यंत वाईट या शब्दात केले ते काही उगाच नाही. हा करार रद्द करण्याचे धाडस आजवर एकाही भारतीय पंतप्रधानाला झाले नाही. ते मोदींनी करून दाखवले. पाकिस्तानला हा झटका इतका मोठा आहे, की पाकिस्तानी राज्यकर्त्यांना भारतीय नेतृत्वाच्या समोर कायम सरपटावे लागणार आहे. पाकिस्तानच्या वतीने भारताला पाठवण्यात आलेले ताजे पत्र हा त्याचा ताजा पुरावा आहे.
पाकिस्तानी नेते चरफडतायत. सिंधूच्या पाण्याचे महत्व त्यांना ठाऊक आहे. ब्रह्मोसने पाकिस्तानी हवाई दलाची कंबर मोडली. परंतु सिंधू जलवाटप करार रद्द करणे हा थेट पाकिस्तानच्या पोटावर मारलेला फटका आहे. त्यामुळे जेव्हा मोदींनी ही घोषणा केली तेव्हा सिंधू से अगर पानी नही बहेगा, तो हिंदुस्तानचा खून बहेगा… अशी डायलॉग बाजी करण्यात आली. भारताची पाणी रोखणारी धरणे क्षेपणास्त्रांनी उडवण्याची धमकी देण्यात आली. भारतावर अण्वस्त्रांचा मारा करण्याची धमकी देण्यात आली. धमक्यांचा उपयोग होत नाही म्हटल्यावर आता ते याचना करू लागले आहेत. त्या ऐकल्या नाहीत ते तर पुन्हा धमक्या देतील. हा प्रकार सुरू राहील. मोदींना पाकिस्तानची औकात माहिती आहे. नखशिखांत भ्रष्टाचाराने माखलेले पाकिस्तानचे नेते लढू शकत नाहीत. पाकिस्तानचे लष्करही वेगळ्या मानसिकतेचे नाही. हे लोक लढणे सोडून बाकीचे सगळे धंदे उत्तम प्रकारे करतात. लढणे हा त्यांचा उद्योग नसून रिअल इस्टेट हा त्यांचा खरा प्रांत आहे, हे मोदींना ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी कोणत्याही धमकीला किंमत दिली नाही.
सोमवारी देशाला केलेल्या ताज्या संबोधनात ‘पानी और खून साथ बहे नही सकता’, हे त्यांनी अगदीच स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे तोंडचे पाणी पळालेल्या पाकिस्तानने भारताला पत्र पाठवलेले आहे. मोदी आता म्हणतायत, पाक व्याप्त काश्मीर कधी खाली करणार हा मुद्दा वगळता पाकिस्तानशी कोणत्याही मुद्दयावर चर्चा करण्यात भारताला रस नाही. हिंदवी स्वराज्यावर जेव्हा मुघलांचे अतिप्रचंड सैन्य चालून यायचे तेव्हा त्यांचे पाणी तोडून त्यांना जेरीस आणण्याची रणनीती छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशव्यांपर्यंत अनेकांनी यशस्वीपणे वापरली. पाणी तोडल्यामुळे दाती तृण धरून शरण येण्याशिवाय दुसरा पर्याय मुघलांसमोर उरत नसे. त्याची पुनरावृत्ती आजचा नया भारत करतो आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)
