काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ‘इंडी’ आघाडीच्या सध्याच्या स्थितीबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी म्हणून विरोधकांनी ‘इंडी’ आघाडी उभी केली होती. मात्र, या आघाडीला भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षासमोर दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर इंडी आघाडीतील अनेक घटक पक्षांच्या नेत्यांनी या आघाडीवर टीका करत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशातच आता या आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस नेत्यांनीचं आता या आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद आणि मृत्युंजय सिंह यादव यांनी लिहिलेल्या ‘कॉन्टेस्टिंग डेमोक्रॅटिक डेफिसिट’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी कॉंग्रेस नेते चिदंबरम बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘इंडी’ आघाडीचे भविष्य उज्ज्वल दिसत नाही. चिदंबरम यांनी इंडी आघाडीच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ही आघाडी अजूनही अबाधित आहे का यावर त्यांना पूर्ण विश्वास नसल्याचे म्हटले. चिदंबरम पुढे म्हणाले, “या पुस्तकाचे लेखक मृत्युंजय सिंह यादव यांचे मत आहे की इंडी आघाडी अजूनही अबाधित आहे. पण, मला याबद्दल खात्री नाही. कदाचित सलमान खुर्शीद याचे उत्तर देऊ शकतील, कारण ते या आघाडीच्या वाटाघाटी पथकाचा भाग होते. जर युती अबाधित राहिली तर आनंदी होईन, परंतु ही युती फारशी मजबूत वाटत नाही. अजूनही मजबूत केली जाऊ शकते, वेळ आहे, घटना आणखी घडतील.”
राजकीय अनुभव सांगताना चिदंबरम म्हणाले की, केवळ निवडणुकीच्या वेळी युती करता येत नाही. पाच वर्षांपर्यंत आघाड्या टिकवाव्या लागतात. देशात फक्त दोनच राज्ये आहेत जिथे हे मॉडेल यशस्वी झाले आहे, ते म्हणजे केरळ आणि तामिळनाडू.
हे ही वाचा :
पाकिस्तानच्या खोट्या बातमीचे ‘विमान’ कोसळले
जयशंकर यांनी मानले तालिबानचे आभार!
ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती द्या! शिवसेनेकडून १० लाख मिळवा!
भाजपाबद्दल बोलताना चिदंबरम म्हणाले की, देशाच्या इतिहासात भाजपसारखा संघटित राजकीय पक्ष कधीच निर्माण झाला नाही. हा फक्त एक पक्ष नाही, तर एक यंत्र आहे. त्यामागे आणखी एक यंत्र आहे. ते एकत्रितपणे देशातील संस्थांवर नियंत्रण ठेवतात. निवडणूक आयोगापासून ते पोलिस ठाण्यांपर्यंत. लोकशाहीमध्ये ही शक्य तितकी शक्तिशाली संघटना आहे.
