कर्नाटकातील कारवार बंदरात इराकचा ध्वज असलेल्या मालवाहू जहाजाच्या कर्मचाऱ्यांना बंदरावर उतरण्याची परवानगी नाकारण्यात आली. जहाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये पाकिस्तानी आणि सीरियन नागरिक असल्याची माहिती आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्नाटकातील कारवार बंदरात इराकी मालवाहू जहाज ‘एमटी आर ओशन’च्या क्रूचा भाग असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाला भारतात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. ११ मे रोजी रात्री इराकमधील अल जुबैर येथून डांबर घेऊन हे जहाज कारवार बंदरात पोहोचले. सुरक्षेच्या कारणास्तव बंदर अधिकाऱ्यांनी पाकिस्तानी आणि सीरियन नागरिकांना जहाजातून उतरू दिले नाही आणि त्यांचे सर्व कागदपत्रे जप्त केली, ज्यात मोबाईल फोनचाही समावेश होता. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या सुरक्षा सतर्कतेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला. त्या हल्ल्यात २६ लोक मृत्युमुखी पडले होते, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते.
वरिष्ठ बंदर अधिकाऱ्याने सांगितले की, जहाजावर एकूण १८ क्रू मेंबर्स होते, ज्यात १५ भारतीय, एक पाकिस्तानी आणि दोन सीरियन नागरिक होते. हे जहाज इराकच्या अल जुबैर बंदरातून भारतात आले होते आणि त्यात डांबर भरलेले होते. जहाज बंदरावर पोहोचताच, तपासणीदरम्यान पाकिस्तानी आणि सीरियन नागरिकांची उपस्थिती लक्षात आल्याने सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला. यानंतर, कोस्टल सिक्युरिटी पोलिस आणि इतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई केली आणि या तिघांचे मोबाईल फोन जप्त केले जेणेकरून ते बाहेरील कोणाशीही संपर्क साधू शकणार नाहीत.
हे ही वाचा :
पाकिस्तानच्या खोट्या बातमीचे ‘विमान’ कोसळले
ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती द्या! शिवसेनेकडून १० लाख मिळवा!
चकमकीपूर्वी दहशतवाद्याला आईचा व्हिडीओ कॉल, म्हणाली “बेटा, शरण जा”
या तीन परदेशी नागरिकांना दोन दिवस जहाजावर ठेवण्यात आले. जहाजातून सामान उतरवण्यात आले. “आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाजांमध्ये विविध देशांचे नागरिक कर्मचारी असले तरी, त्यांना भारतीय बंदरांवर उतरण्यासाठी विशेष परवानगी आवश्यक असते. सध्याची सुरक्षा परिस्थिती पाहता, ही परवानगी देण्यात आली नाही,” असे बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले. माहितीनुसार, १४ मे रोजी सकाळी ९:२० वाजता जहाज शारजासाठी रवाना झाले. सुरक्षा पोलिस निरीक्षक निश्चल कुमार यांनी पुष्टी केली की, “या तिघांनाही मोबाईल फोन वापरण्यास मनाई करण्यात आली होती आणि त्यांना जहाजासह परत पाठवण्यात आले होते. किनारपट्टीवरील देखरेख वाढवण्यात आली आहे आणि संवेदनशील भागांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.”
