‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताची लष्करी ताकद साऱ्या जगाने पाहिली असून या ताकदीला आता आणखी बळ मिळणार आहे. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त करणाऱ्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत सरकार संरक्षण बजेट आणखी मजबूत करण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या रकमेत शस्त्रे आणि दारूगोळा खरेदी तसेच तंत्रज्ञानावर खर्च केला जाईल, असे बोलले जात आहे.
माहितीनुसार, संरक्षण क्षेत्रातील नवीन शस्त्रे, दारूगोळा आणि तंत्रज्ञान खरेदीसाठी ५०,००० कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्याला मंजुरी मिळू शकते. या अतिरिक्त अर्थसंकल्पाद्वारे, सशस्त्र दलांच्या प्राथमिक गरजा, आवश्यक खरेदी आणि संशोधन- विकास (R&D) यासाठी तरतूद केली जाईल. या वर्षी, संरक्षणासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विक्रमी ६.८१ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, जी मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत ९.५३ टक्के जास्त आहे. एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून, गेल्या १० वर्षांत संरक्षण बजेटमध्ये जवळजवळ तिप्पट वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये संरक्षण बजेट २.२९ लाख कोटी रुपये होते. या वर्षी ६.८१ लाख कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे, जे एकूण बजेटच्या १३.४५ टक्के आहे.
हे ही वाचा :
इराकी जहाजाच्या क्रूमधील पाकिस्तानी नागरिकाला कारवार बंदरात प्रवेश नाकारला
पाकिस्तानच्या खोट्या बातमीचे ‘विमान’ कोसळले
ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती द्या! शिवसेनेकडून १० लाख मिळवा!
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले. यातून भारताच्या संरक्षण ताकदीची झलक जगाला दिसून आली. याशिवाय पाकिस्तानसोबतच्या युद्धादरम्यान, भारताच्या बहुस्तरीय हवाई संरक्षण यंत्रणेने, ज्यामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा देखील समावेश होता, प्रत्येक येणारे क्षेपणास्त्र आणि ड्रोन निष्क्रिय केले. पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांना हाणून पाडण्यासाठी भारताने लांब पल्ल्याच्या रशियन एस- ४०० ट्रायम्फ प्रणालीव्यतिरिक्त, बराक- ८ मध्यम पल्ल्याच्या एसएएम प्रणाली आणि स्वदेशी आकाश प्रणाली तैनात केली. ब्राह्मोसचाही वापर करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात भारताच्या कामगिरीचे कौतुक केले.
