राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीला मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाल्याची घटना शनिवारी घडली. सुदैवाने या अपघातात सुप्रिया सुळे, त्यांचे चालक आणि खासगी सहाय्यक हे तिघेही सुरक्षित बचावले. मात्र या घटनेमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील बेफाम वाहनचालकांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे या पुण्यावरून मुंबईकडे प्रवास करत होत्या. रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत माडाप बोगद्याजवळ त्यांच्या वाहनाला भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्पोर्ट्स युटिलिटी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक अचानक झाल्याने काही क्षण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण मिळवले आणि मोठा अनर्थ टळला.
हे ही वाचा:
देशातील सर्वात मोठ्या IPO ची तयारी
पश्चिम बंगालमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
प्रोजेक्ट कुडनकुलम: आत्मनिर्भर अणुक्रांती
तामिळनाडूत विजय यांचे सरकार येण्याचा मार्ग झाला मोकळा
अपघातानंतर सुप्रिया सुळे यांनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाढत्या निष्काळजी वाहनचालकांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. “अतिवेग आणि बेदरकार वाहनचालकांमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले. त्यांनी संबंधित वाहनाचा क्रमांकही नमूद करत पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील सर्वाधिक वर्दळीचा आणि वेगवान महामार्ग मानला जातो. दररोज हजारो वाहने या मार्गावरून प्रवास करतात. मात्र अतिवेग, चुकीची ओव्हरटेकिंग आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे येथे वारंवार भीषण अपघात घडत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही महिन्यांत या मार्गावर अनेक गंभीर दुर्घटना घडल्या असून त्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेनंतर खालापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. धडक देणाऱ्या वाहनचालकाची माहिती तपासली जात असून त्याच्याविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.







