तामिळनाडूत सर्वाधिक जागा जिंकणारे थलपती विजय यांना विदयुतलाई चिरुथाइगल कची (व्हीसीके) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा दावा करण्यासाठी आवश्यक असलेला ११८ आमदारांचा आकडा अखेर टीव्हीकेने पार केला आहे. संध्याकाळी विजय हे राज्यपाल आर्लेकर यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा दाखल करतील.
टीव्हीकेला आता एकूण १२१ आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीकेने निवडणुकीत १०८ जागा जिंकून डीएमके आणि एआयडीएमके सारख्या मोठ्या द्रविड पक्षांना धक्का दिला होता. मात्र विजय यांनी दोन जागांवर विजय मिळवल्याने एक जागा रिक्त करावी लागणार असून टीव्हीकेची प्रभावी ताकद १०७ राहणार आहे.
- 118 चा जादुई आकडा कसा पूर्ण झाला?
गणित असे:
- टीव्हीके – १०८
- काँग्रेस – ५
- डावे पक्ष – ४
- व्हीसीके – २
- मुस्लिम लीग – २
एकूण: १२१ आमदार
काँग्रेसने सुरुवातीपासूनच टीव्हीकेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर डाव्या पक्षांनीही समर्थन जाहीर केले. अखेरीस व्हीसीके आणि मुस्लिम लीगच्या पाठिंब्यामुळे विजय यांचा मार्ग सुकर झाला.
व्हीसीके प्रमुख थोल थिरुमावलवन सुरुवातीला नाराज असल्याची चर्चा होती. कारण विजय यांनी वैयक्तिकरित्या संपर्क न करता व्हाटसअप संदेशाद्वारे पाठिंबा मागितल्याचे सांगितले गेले. मुस्लिम लीगनेही सुरुवातीला आपण डीएमकेसोबतच असल्याचे म्हटले होते. मात्र शनिवारी सकाळी टीव्हीके नेत्यांनी दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर परिस्थिती बदलली.
हे ही वाचा:
रिलायन्स समूहाशी संबंधित प्रकरणांमध्ये मुंबईतील १७ ठिकाणी छापेमारी
बापमाणूस सूर्या आता मैदान गाजवणार
एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा
अखेर ममतांनी पराभव स्वीकारलाच!
व्हीसीकेने बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी पक्षनेते वन्नी आरासू यांनी पुढे सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत नंतर निर्णय घेतला जाईल असे म्हटले. तसेच विजय रिक्त करणार असलेल्या जागेवर थिरुमावलवन यांनी निवडणूक लढवावी आणि पुढे उपमुख्यमंत्री व्हावे अशी पक्षाची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यपालांसोबत तीन दिवसांत तीन भेटी
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची विजय यांनी सलग तीन दिवस भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला होता. मात्र प्रत्येक वेळी आवश्यक आकडा नसल्याने त्यांना परत पाठवण्यात आले. विरोधकांनी राज्यपालांवर भाजपा नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला होता. मात्र राजभवनाने हे आरोप फेटाळले. काही घटनातज्ज्ञांनी राज्यपालांनी प्रथम सर्वात मोठ्या पक्षालाच निमंत्रण द्यायला हवे असे मत व्यक्त केले होते.
एएमएमके आमदार प्रकरण
शुक्रवारी विजय यांनी एएमएमकेच्या आमदार कामराज यांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे दिले होते. मात्र काही वेळातच एएमएमके सरचिटणीस दिनाकरन यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्या सही बनावट असल्याचा दावा केला. यानंतर टीव्हीकेने कामराज समर्थनपत्र लिहितानाचा कथित व्हिडिओ प्रसिद्ध केला. या वादामुळे विजय यांची संख्या ११६ वर अडकली होती.
मात्र व्हीसीके आणि मुस्लिम लीग यांच्या अखेरच्या पाठिंब्यामुळे आता विजय यांच्यासाठी सरकार स्थापनेचा मार्ग जवळपास निश्चित मानला जात आहे. “थलपती” म्हणून ओळखले जाणारे विजय आता तमिळनाडूच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.







