30.1 C
Mumbai
Monday, May 11, 2026
घरविशेषशतायुषी निसर्गप्रेमी डेव्हिड ऍटनबरोंना एका निसर्गप्रेमीच्या अशाही शुभेच्छा!

शतायुषी निसर्गप्रेमी डेव्हिड ऍटनबरोंना एका निसर्गप्रेमीच्या अशाही शुभेच्छा!

राज ठाकरेंनी लिहिले खास पत्र

Google News Follow

Related

सध्याच्या राजकारणात एकमेकांवर चिखलफेक, आरोप प्रत्यारोप याची सर्वांनाच सवय झाली आहे. त्यातून वेळ काढून वेगळ्या एखाद्या विषयावर बोलणारा, लिहिणारा राजकारणी सापडणे तसे दुर्मिळ. पण कलाप्रेमी, निसर्गप्रेमी असलेले मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सर डेव्हिड ऍटनबरो यांच्यावर एक सुखद पोस्ट लिहिली. ऍटनबरो यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने त्यांच्या निसर्गप्रेमावर आधारित सीरिजबद्दलचे अनुभव राज ठाकरे यांनी आपल्या या पोस्टमध्ये उद्धृत केले आहेत.

ही पोस्ट न्यूज डंकाच्या वाचकांसाठी-

माझे अत्यंत आवडते टीव्ही सादरकर्ते सर डेव्हिड अटेनबरो यांनी आज वयाची १०० वर्ष पूर्ण केली. त्याबद्दल डेव्हिड अटेनबरो यांना अनेकोत्तम शुभेच्छा. २००६ च्या आसपास डेव्हिड अटेनबरो यांची ‘प्लॅनेट अर्थ’ नावाची सिरीज आली होती.

तो काळ डीव्हीडीजचा होता. तेंव्हापासून डेव्हिड अटेनबरो या माणसाच्या कामाने मला शब्दशः वेड लावलं होतं. ‘प्लॅनेट अर्थ’ पासून पुढे आलेल्या सीरिजच्या डीव्हीडीज आणि पुढच्या काळात ब्ल्युरेज, रिलीज झाल्या रे झाल्या की त्या मिळवून बघणे हा माझा छंदच झाला होता. पुढे २०१३ मध्ये त्यांची ‘आफ्रिका’ ही सिरीज आली. त्याचा सुरुवातीचा मोंटाज इतका सुंदर आणि व्हिज्युअल स्टोरीटेलिंगचा उत्कृष्ट नमुना होता, जो मी कितीवेळा पाहिला असेल याची मोजदादच नाही. मला नेहमी सर अटेनबरोंच्या डॉक्युमेंट्रीज बघताना एक गोष्ट वाटत राहते ते म्हणजे, ते ज्या पद्धतीने सांगतात ती एक परीकथा वाटते आणि त्या सांगण्यात, त्या कथेत आपण गुंतून जातो आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट कायमची मनात घर करून बसते. डॉक्युमेंट्रीतून एखादा विषय मांडणारे अनेक जण होऊन गेले पण डेव्हिड अटेनबरोंच्या सारखा विरळाच.

हे ही वाचा:

गोवा शिपयार्डमध्ये ‘अचल’ची भारतीय तटरक्षक दलात दमदार एन्ट्री

बापमाणूस सूर्या आता मैदान गाजवणार

मदरशात १३ वर्षांच्या विद्यार्थ्यावर बलात्कार; शिक्षक अटकेत

एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा

सर डेव्हिड अटेनबरो यांच्या आयुष्याकडे पाहिलं की कमाल वाटते की हा माणूस काय जगलाय आणि काय जगाला देऊन गेलाय ? कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट ) ते रंगीत ते हाय डेफिनिशन ते ३डी ते ४के या सगळ्या बदलांच्या काळात तो माणूस पडद्यावर होता, निसर्गाची कथा त्याच उत्कंठतेने सांगत होता, आणि हे करताना स्वतः पडदा न व्यापता, त्यांचं ज्या निसर्गावर अतिशय प्रेम होतं त्या निसर्गाला, त्यातील विस्मयकारक गोष्टींनाच त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं. अनेक माणसं १०० वर्ष जगतात पण अशी थोडी फार माणसं असतात ती या काळात सातत्याने कशाचा शोध घेत असतात आणि तो शोध हाच त्यांचा मित्र असतो.

गेल्या १०० वर्षांत अटेनबरोनी त्यांच्याशी निगडित काय पाहिलं नाही ? टीव्हीचा उदय पाहिला, दुसरं महायुद्ध पाहिलं, कृष्णधवल टीव्हीचा स्क्रीन रंगीत झालेला पाहिला, सॅटेलाईट क्रांती पाहिली, जेट युग पाहिलं, डिजिटल युग, इंटरनेट युग आणि निसर्गाचा एक घटक ते विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करणाऱ्या मानवाचा प्रवास पाहिला. एका अर्थाने मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील सगळ्यात वेगवान शतकाला अनुभवलं आणि त्याचवेळेस या सगळ्या बदलांनी विचलित न होता निसर्गाची कथा ते भरभरून मांडत राहिले. सुरुवातीला हा निसर्ग किती सुंदर आहे हे सांगणारे अटेनबरो पुढे आपण या निसर्गाचीच काय हानी करत आहोत हे उद्वेगाने मांडायला लागले. अवघ्या पाच सहा दशकांत झालेला ऱ्हास याचं मूर्तिमंत उदाहरण कुठे शोधायचं असेल तर डेव्हिड अटेनबरो यांच्या डॉक्युमेंट्रीजच्या प्रवासात सापडेल.

पब्लिक ब्रॉडकास्टींग इतका सुंदर कन्टेन्ट तयार करू शकतो आणि तो विज्ञान, निसर्ग इतक्या सोप्या आणि दृश्य पद्धतीने शिकवू शकतो हे जसं बीबीसी २ ने दाखवलं तसंच ते इतकं प्रभावी आणि अचूक कसं असू शकतं हे डेव्हिड अटेनबरो यांनी दाखवलं. अटेनबरो यांच्याबद्दल मला अजून खूप दीर्घ लिहिता येईल. पण त्याऐवजी मी मराठी तरुण-तरुणींना विनंती करेन की कृपा करून त्यांच्या डॉक्युमेंट्रीज बघा. त्या स्टोरीटेलिंगसाठी बघाच पण निसर्ग किती सुंदर आहे आणि आपण तो अमुक रस्ता, तमुक ब्रिज यांच्या नावाखाली कसा उद्ध्वस्त करत आहोत हे समजून घेण्यासाठी पण बघा. आणि अजून एका कारणासाठी अटेनबरो माझ्या माध्यमातील सहकाऱ्यांनी बघा ते म्हणजे एखाद्या विषयातील अभ्यास जर पक्का असेल तर तुम्हाला माझा कन्टेन्ट कोणी बघेल का? मला तो व्हायरल करायला काय करावं लागेल याची चिंता करावी लागत नाही यासाठी नक्की बघा.

अटेनबरो ज्या काळात जन्माला आले तेंव्हा पृथीबद्दलच, निसर्गाबद्दलच कुतूहल जागृत असण्याचा काळ होता, ते आज अवघ्या १०० वर्षांचे आहेत जेंव्हा हे कुतूहल जाऊन पृथ्वी, निसर्ग पार उध्वस्त करण्यापर्यंतचा काळ त्यांना बघावा लागत आहे. त्यांना इतकं दीर्घायुष्य लाभू दे की ही पृथ्वी हा निसर्ग पुन्हा रसरसलेला त्यांना बघायला मिळेल.

सर डेव्हिड अटेनबरो यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा ! राज ठाकरे

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
306,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा